नंदुरबारसह चारही शहरांचे व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:21 IST2020-07-24T12:21:13+5:302020-07-24T12:21:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबारसह शहादा, नवापूर व तळोद्यात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले ...

नंदुरबारसह चारही शहरांचे व्यवहार ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबारसह शहादा, नवापूर व तळोद्यात लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. केवळ रुग्णालये, औषधी दुकाने आणि कृषी निविष्ठा विक्रीची दुकाने सुरू होती. जेमतेम बाजारपेठ रुळावर येत असतांनाच लॉकडाऊनच्या निर्णयामुळे पुन्हा अर्थव्यवहाराला खिळ बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, नंदुरबारात सकाळी ११ वाजेपर्यंत उड्डाणपूल आणि नळवा रस्त्याखालील बोगदा रस्ता देखील बंद करण्यात आल्याने दवाखान्यात येणारे, शासकीय कार्यालयात जाणारे नागरिक यांना पाच किलोमिटरचा फेरा मारून रेल्वे पट्ट्याच्या अलीकडे किंवा पलिकडे जावे लागत होते.
आठ दिवशीय लॉकडाऊनचा गुरुवारी पहिला दिवस होता. सर्वच व्यवहार बंद करण्याचा निर्णय असल्यामुळे सकाळी नऊ वाजेच्या आत दूध विक्रेते, पेपर विक्रेत्यांनी आपले काम केले. त्यानंतर मात्र केवळ रुग्णालये, औषधी आणि कृषी निविष्ठा विक्रीची दुकानेच तेवढी सुरू होती. त्यामुळे दिवसभर शहरातील सर्वच भागात शुकशुकाट दिसून आला.
आदेशाचा अतिरेक नको...
नंदुरबारात रहदारीचे नियमन करतांना स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी मात्र नागरिकांना वेठीस धरल्याचे दिसून आले. रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. त्यामुळे शहरात येणारा व जाणारा मार्ग म्हणून उड्डाणपूल आहे. लहान वाहने व दुचाकी यांच्यासाठी नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचा रस्ता आहे. परंतु हे दोन्ही रस्ते सकाळी पोलिसांनी बॅरीकेटींग लावून बंद करून ठेवले होते. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी तसेच दोन्ही भागातील नागरिकांना रुग्णालये किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी थेट वळण रस्त्यावरून बाहेरचा उड्डाणपुलमार्गे यावे किंवा जावे लागत होते. त्यामुळे तब्बल पाच ते सहा किलोमिटरचा फेरा मारावा लागत होता. आधीच पेट्रोल पंपांवर पेट्रोल देण्यासाठी मर्यादा लावण्यात आलेल्या असतांना नागरिकांना एवढा फेरा मारून जावे लागत असल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांना उड्डाणपुलावरून येण्यास व जाण्यास परवाणगी होती.
परंतु शासकीय कर्मचारी व इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना मनाई करण्यात येत होती. अनेकजण पेशंट होते त्यांनाही मनाई करण्यात येत होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत होती. दुपारी ११ वाजेनंतर मात्र उड्डाणपुलावरील बॅरीकेटींग काढून घेण्यात आल्याचे दिसून आले. सायंकाळी पुन्हा ते लावण्यात आले.
कृषी निविष्ठा सुरू, पण ग्राहकांची प्रतिक्षा...
लॉकडाऊनमधून कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सूट देण्यात आली होती. सर्वच कृषी निविष्ठा विक्रीची दुकाने सुरू असली तरी ग्राहक कुणीच फिरकले नसल्याची स्थिती आहे. शहरात वाहने येण्यास मज्जाव, नागरिकांना येण्यास मनाई, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असे असतांना कृषी निविष्ठा सुरू ठेऊन उपयोग काय? अशा प्रतिक्रिया शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत होत्या. मार्च ते जून अशा जवळपास दोन ते अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर जूनच्या पहिल्या आठवड्यापासून बाजारपेठ जेमतेम सुरळीत झाली होती. आर्थिक व्यवहाराचा गाडा रुळावर आलेला असतांना अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाºयांचे पुन्हा मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. सरसकट लॉकडाऊन ऐवजी पर्यायी विचार करणे आवश्यक होते असे अनेकांचे म्हणने होते.
४बँकां सुरू असल्या तरी व्यवहार मात्र बंद होते. त्यामुळे नेहमीच दिसून येणाºया ग्राहकांच्या रांगा किंवा गर्दी आज एकाही बँकेच्या बाहेर दिसून आली नाही. काही बँकांनी मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवला होता तर काही बँकांनी शटरच डाऊन केलेले होते. दुसरीकडे मात्र एटीएम सुरू होते. बहुतेक सर्वच एटीएममध्ये रक्कम पुरेशा प्रमाणात होती.