शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST2019-09-15T11:59:19+5:302019-09-15T13:01:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या ...

The traffic on the Shewali-Netrang highway was smooth after 24 hours | शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढल्यानंतर तब्बल 24 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून महाराष्ट्रात कारखान्यात उपयोगात येणारे साहित्य घेऊन जात असलेला ट्राला (क्रमांक जीजे-01 सीई- 7951) पेचरीदेव येथील पुलावरील खड्डय़ात अडकल्याने व त्यावरील अवजड साहित्य एका बाजूला झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा ट्राला पुलाच्या मध्यभागी अडकल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नव्हती. केवळ मोटारसायकल व तीनचाकी रिक्षांची ये-जा सुरू होती. मोठय़ा वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी कोराई चौफुलीवर बेरिकेट्स लावून मोठी वाहने पुढे जाण्यापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे अक्कलकुव्यार्पयत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर पेचरीदेवपासून गुजरातमधील सागबारार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लांब पल्ल्याच्या बसेस अक्कलकुवा येथून गुजरातमध्ये जाऊ शकत नसल्याने रस्त्यात थांबून असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर काही बसचालक मोरंबामार्गे मार्गस्थ होत असल्याने वेळ लागत होता. पुलावर अडकलेला ट्रॉला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढण्यात आला. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. 
सध्या नेत्रंग-शेवाळी महामार्ग हा तळोदा ते गुजरात सीमेवरील डोडवार्पयत अत्यंत खराब झालेला असून पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यातच अक्कलकुवा येथील वरखेडी नदीवरील पूल व पेचरीदेव येथील पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे तुटल्यामुळे अपघाताची स्थिती  निर्माण झाली आहे. याकडे  महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.
 

Web Title: The traffic on the Shewali-Netrang highway was smooth after 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.