रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:45+5:302021-06-27T04:20:45+5:30
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा रस्त्याचे काम सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडादरम्यान अनेक दिवसांपासून काम अपूर्ण आहे. हे काम ...

रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा रस्त्याचे काम सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडादरम्यान अनेक दिवसांपासून काम अपूर्ण आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले आणि त्याचा परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. या रस्त्यावर माती व मुरुम टाकण्यात आला आहे. थोडाही पाऊस झाला की चिखल होऊन वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादे अवजड वाहन चिखलात रुतले तर वाहतूक ठप्प होते. ही बाब दररोजची झाली आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी बसही रस्त्याच्या खाली घसरली होती. त्यातील प्रवाशांना पायपीट करीत जावे लागते होते. दुचाकीधारकांना तर कसरत करीत वाहने चालवावी लागतात. शनिवारी सायंकाळीही एक ट्रक चिखलात रुतल्याने वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला करण्यात आला. तोपर्यंत मात्र वाहतूक ठप्प झाल्याने इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदाराने वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी उपाययोजना करून रस्त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी होत आहे.