अवजड वाहने अडकल्याने वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:23 IST2019-11-25T11:23:43+5:302019-11-25T11:23:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावर रविवारी दोन अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प ...

अवजड वाहने अडकल्याने वाहतूक ठप्प
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : प्रकाशा-डामरखेडा रस्त्यावर रविवारी दोन अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक ठप्प झाल्याने तासभर इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते शहादा दरम्यान रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. त्यातच प्रकाशा ते करजई-बुपकरी दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. कच्च्या रस्त्यामुळे धूळही मोठय़ा प्रमाणात उडत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रविवारी गोमाई नदीवरील पुलावर एक अवजड वाहन तर दुसरे अवजड वाहन डामरखेडा गावालगत अडकल्याने इतर वाहनांना निघण्यासाठी जागाच नव्हती. त्यामुळे या मार्गावर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. अवजड वाहने, ऊस वाहून नेणारी वाहने यांच्यासाठी प्रकाशा ते डामरखेडा रस्ता तारेवरची कसरत बनला आहे. त्यातच वाहन नादुरूस्त होणे, हळू चालणे, वाहन थांबणे असे प्रकार घडत असल्याने वारंवार वाहतूक ठप्प होते.
रविवारी वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकांचे हाल झाले. रुग्णवाहिकाही अडकून होती. अशात अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठेकेदाराला समज देणे आवश्यक आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस वाहतूक करणा:या वाहनांची संख्या वाढली आहे. या वाहनांना अपघात होऊ नये म्हणून रस्त्याची दुरुस्ती आवश्यक आहे. रस्त्याचे काम करणा:या संबंधित ठेकेदाराला वरिष्ठ अधिका:यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सक्त ताकीद देण्याची आवश्यकता आहे.