संथगतीच्या कामाने वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:40 IST2020-03-21T11:40:30+5:302020-03-21T11:40:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या ...

संथगतीच्या कामाने वाहतुकीला अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : विसरवाडी ते खेतिया रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. याचा पहिला टप्पा असलेल्या कोळदा ते खेतिया रस्त्याचे काही ठिकाणी काम संथगतीने होत असल्याने रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. परिणामी हा रस्ता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या रस्त्यावर अनेक मोठे अपघात झाले असून, यात नाहक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा अनेक वाहनचालक मनमानी कारभार करत असून, रस्त्याच्या कडेला आपली वाहने उभी करत असल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्यामुळे सध्या तरी हा रस्ता मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे.
कोळदा ते खेतिया पावेतोच्या रस्त्याचे काम गत वर्षभरापासून सुरू आहे. सद्या शहादा शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असून, या रस्त्याच्या दोन्हीबाजुला गटारी तयार केल्या जात आहेत. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक येणार असल्याने शहादा ते प्रकाशा रस्त्यावरील १३२ के.व्ही. सब स्टेशनपासून ते वनविभाग चौफुलीपावेतोच्या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. दुभाजकाचे काम सध्या सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस गटारी तयार करण्यात आल्या आहेत. या गटारीलगत रिकामी चारचाकी वाहने उभी केली जातात. विशेषत : मालट्रक उभ्या राहत असल्याने रस्त्याने जाणाºया दुचाकी, चारचाकी वाहनांना रस्ता ओलांडून ये-जा करतांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने आतापावेतो किरकोळ अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजुस ही रिकामी वाहने उभी राहत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नुकतीच याच रस्त्यावर एक घटना घडली. शिरूड चौफूलीच्यापुढे एक ट्रक रस्त्यालगत उभा होता. या ट्रकवर ताडपत्री बांधण्याचे काम सुरू असतांना जोरदार हवेने ताडपत्री उडून रस्त्याने जाणाºया दुचाकी स्वारावर ती पडली. परिणामी अपघात होवून दुचाकीवरील दोघांना जायबंदी व्हावे लागले. त्यांचा दोष नसतांना अपघात झाल्याने रस्त्याने जाणाºया वाहनधारकांनी रोष व्यक्त केला. शहादा शहरातून जाणाºया या रस्त्यालगत उभ्या राहणाºया वाहनधारकंंना संबंधीतांनी सूचना देवून भविष्यातील दुर्घटना टाळण्याची अपेक्षा सुज्ञ वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत सोशल मिडीयातूनही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दरम्यान, शहादा शहरातून जाणाºया महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या व्यवसायिकांनी थेट गटारीसह रस्त्यावरच व्यवसायाला प्रारंभ केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन तसेच संबंधीतांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात या रस्त्यावर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असून, शहादा शहरालगतच्या रस्त्याच्या दोन्ही किनारी वाहने लावण्यात आल्याने किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी रिकामी वाहने रस्त्यालगत उभी राहू नयेत यासाठी संबंधीतांना सूचना करणे गरजेचे झाले आहे.