शहाद्यातील वाहतूक नियंत्रण कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:46 IST2020-12-19T10:46:00+5:302020-12-19T10:46:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बसस्थानक परिसर ते नगरपालिका चौकापर्यंत हातगाडीधारकांसह अवैध ...

Traffic control in Shahada collapsed | शहाद्यातील वाहतूक नियंत्रण कोलमडले

शहाद्यातील वाहतूक नियंत्रण कोलमडले

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :  शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बसस्थानक परिसर ते नगरपालिका चौकापर्यंत हातगाडीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्यावर उभी राहतात. वाहने सुसाट नेली जातात. पोलिसांचा धाक संपला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिका व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस जटील होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांनी दखल घेऊन कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.
           वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब ठरली आहे. शहरातील सर्वाधिक रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर सर्वाधिक वाहतुकीची कोंडी असते. चोहोबाजूंनी शहरात येण्यासाठी व शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. दोंडाईचा रस्ता, डोंगरगाव रस्ता तसेच खेतिया रस्ता शहरातून जातो. याच मुख्य मार्गावर हातगाडीधारकांची मनमानी वाहतूक कोंडीची मुख्य समस्या आहे. शहरात हॉकर्स झोन नाही. फेरीवाले विक्रेत्यांसाठी ठराविक जागा नसल्याने फेरीवाले विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. भाजी मंडईव्यतिरिक्त फेरीवाले विक्रेते तहसील कचेरी परिसर, बसस्थानक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॉर्नर, भाजी मंडई प्रवेशद्वार, महात्मा गांधी पुतळा चौक, नगरपालिका चौक, डायमंड कॉर्नर, महात्मा फुले पुतळा परिसर आदी भागात रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीधारक उभे राहतात. भररस्त्यात हातगाडी उभी करून फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाडीधारकांमुळे दिवसभरातून अनेकदा वाहनांची रांग लागते. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंगही उद्‌भवतात.
            दुचाकीवर अल्पवयीन मुले-मुली सुसाट झाले आहेत. केंद्रीय वाहतूक विभागाने वाहतुकीची नियमावली कठोर केली आहे. याची अंमलबजावणीची जबाबदारी वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाला दिली आहे; मात्र या दोन्ही विभागातून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक वाहतूक नियमांची पायमल्ली करीत असतात. दुचाकी व चारचाकी वाहनधारक सुसाट वेगाने वाहने पळवितात. वास्तविक बाजारपेठेत वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे; मात्र दुचाकीवर तीन सीट बसवून जोरात कर्णकर्कश हॉर्न वाजवत अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याचेही चित्र नेहमीचे झाले आहे. शाळा-महाविद्यालयीन मुले सुसाट वेगात वाहन चालवत असून, अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

एकमार्गी वाहतूक उरली नावाला...
        शहरात एकमार्गी वाहतूक फक्त नावालाच उरली आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी, यासाठी मोजके दोन तीन वन-वे आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेदरम्यान स्टेट बँक चौकापासून शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे; मात्र दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. कायमस्वरूपी उपाययोजनांऐवजी केवळ बैठका झाल्या असल्याने ठोस कारवाई केली जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत; मात्र या पोलिसांसमोरच अल्पवयीन शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी दुचाकी सुसाट वेगाने पळवत असून, अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून नेले जात आहे. परिणामी, वाहतूक पोलीस शहरात करतात तरी काय, याचा शोध पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. केवळ एक दिवस कारवाई करून, बैठका घेऊन ही गहन समस्या सुटणार नाही तर यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निर्णायक भूमिका घेणे काळाची गरज आहे.

Web Title: Traffic control in Shahada collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.