रस्ते खचल्याने वाहतूक बनली धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST2021-02-21T04:58:23+5:302021-02-21T04:58:23+5:30
सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील अनेक रस्ते खचले आहेत. भगदरीचा मोजापाडा येथे एक, मोजाबारीच्या उत्तरेस तीन ठिकाणी पुलांची गरज ...

रस्ते खचल्याने वाहतूक बनली धोकेदायक
सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील अनेक रस्ते खचले आहेत. भगदरीचा मोजापाडा येथे एक, मोजाबारीच्या उत्तरेस तीन ठिकाणी पुलांची गरज असून, पळासखोब्राच्या भगतपाडा येथील हॅन्डपंपाजवळ, डेब्रामाळचा पवंत्याआडी येथे दोन ठिकाणी व मवानीपाडा येथे पुलाची गरज आहे. मोजापाडा हॅन्डपंपाजवळ उतारावर संरक्षक भिंत किंवा कठड्याची गरज असून, यात मोजाबारीच्या उत्तरेस, वेलखेडी बारीपाडा चढावच्या भागात दोन ठिकाणी व गावाजवळ नवा दामज्या यांच्या घराच्या पूर्वेस नदीच्या काठावर व वेलखेडी येथील राजा देवजी यांच्या घराजवळ नदीला लागून, मिठा कागडा यांच्या घराजवळ, वेस्ता कागडा यांच्या घरासमोर व घराच्या उत्तरेस माकडकुंडच्या कोनबीचापडा, पळासखोब्रा येथील किरसिंग बावा वळवी यांच्या घराजवळ दक्षिणेस दोन-तीन ठिकाणी, बोखा नूरजी वळवी यांच्या घराच्या दोन ठिकाणी दक्षिणेस, उतारच्या जागेवर, पुरता बावा यांच्या घराच्या पूर्वेस, भगतपाडा येथे भीमसिंग सूरजा यांच्या घराजवळ उत्तरेस उतारच्या भागात, मिठीबिलपाडा येथे, डेमरीबारीपाडा येथे, डेब्रामाळच्या पवत्याआडी येथे दोन ठिकाणी, डेब्रामाळच्या माथेपाडा आदी ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूचा भाग खचून धोकेदायक स्थिती निर्माण झाली आहे. या खचलेल्या भागात संरक्षक भिंती किंवा संरक्षक कठड्यांची गरज आहे. नदी-नाल्यांवर पूल व फरशा बांधण्याची गरज आहे. चढावाच्या वळणावर वळण मोठे नसल्याने मोठ्या वाहनचालकांना या ठिकाणी वाहने काढण्यासाठी कसरत करावी लागते. रस्ता योग्य नसल्याने या परिसरात अद्यापही एस.टी. बस येऊ शकत नसल्याने या परिसरातील नागरिकांना गैरसोयीचे झाले आहे.
अडीच ते पाच किलोमीटरची पायपीट
डेब्रामाळ ते आंबावाईपाडा यादरम्यान अडीच किलोमीटरचा रस्ता नसल्याने आंबावाईपाडा व बुदेमालपाडा येथील नागरिकांना अडीच तर डनेलच्या कुडीडोगरपाडा, हेल्टाईपाडा, बालाजापाडा येथील नागरिकांना पाच किलोमीटर, डनेलच्या सुरवाणीपाडा येथील नागरिकांना तीन किलोमीटर खडतर चढ-उताराच्या डोंगरमाथ्याच्या पायवाटेने मांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी यावे लागते.
सांबर पळासखोब्राच्या बुदेमालपाडा, पळासखोब्रा मिठीबिनीपाडा या रस्त्यावर खडी टाकण्यात आली. मात्र खडीकरण व डांबरीकरण झाले नसल्याने त्रासदायक झाले आहे. या रस्त्यांवर खडीकरण व डांबरीकरणाची मागणी या परिसरातील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.