लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समोरून येणाऱ्या रिक्षाला साईड देण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला उलटून चालक जागीच ठार झाल्याची घटना पळशी ते खोलविहीर, ता.नवापूर रस्त्यावर घडली. विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश काळुसिंग गांगुर्डे (३६)रा.श्रीरामपूर, ता.नंदुबार असे मयताचे नाव आहे. पळशी ते खोलविहिर रोडवर २९ रोजी सकाळी हा अपघात झाला. पळशीकडून खोलविहीरकडे जाणारे ट्रॅक्टर व समोरून येणारी प्रवासी रिक्षा समोरासमोर आले. रस्ता सिंगल असल्यामुळे दोन्ही वाहने एकाचवेळी जाऊ शकत नव्हती. त्यामुळे ट्रॅक्टर चालक महेश गांगुर्डे यांनी ट्रॅक्टर एका साईडला घेण्याचा प्रयत्न केला. ट्रॅक्टरचे चाक खाली खोल रस्त्यावर घसरले. त्यामुळे ट्रॅक्टरचा बॅलेन्स जाऊन ते उलटले. त्याखाली दाबला गेल्याने महेश गांगुर्डे हा जागीच ठार झाला. अपघातात ट्रॅक्टरचे देखील मोठे नुकसान झाले आहे.याबाबत काळुसिंग धर्मा गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार विश्वास गावीत करीत आहे.
साईड देतांना ट्रॅक्टर उलटले, चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:07 PM