दरा मध्यम प्रकल्पावर पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:49 IST2020-07-30T12:49:40+5:302020-07-30T12:49:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, नदी नाल्यांना पाणी आल्याने मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला ...

दरा मध्यम प्रकल्पावर पर्यटकांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून, नदी नाल्यांना पाणी आल्याने मध्यम प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. दरा प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा वाढल्याने सांडवा ओसंडून वाहू लागला आहे. एक छोटे प्रेक्षणीय स्थळ हे प्रकल्प बनले असून, दररोज शेकडो नागरिक हजेरी लावत आहेत. परंतु प्रकल्पाला लागून पर्यटकांसाठी कुठेही सुरक्षिततेच्या दृष्टीने कठडे नसल्याने उनपदेव लगत असलेला मध्यम प्रकल्प हा पर्यटकांसाठी धोका निर्माण होवू शकतो. याकरिता संबंधित विभागाकडून सुरक्षित कठडे बांधण्यात यावे अशी मागणी आहे.
शहादा-जळगाव रस्त्यावर शहाद्यापासून २३ किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या कुशीत उनपदेव हे प्रक्षेणीय स्थळ आहे. याच परिसरात दरा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प गेल्या वर्षापासून पूर्ण क्षमतेने भरत असल्याने या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी होत आहे. शहादा-धडगाव रस्त्यावर हा प्रकल्प असल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेसाठी ते प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. प्रकल्पाचा परिसर नयनरम्य व निसर्गाने बहरलेला असल्याने सुटीच्या दिवशी विद्यार्थ्यांसह नागरिकांची येथे गर्दी होत असते. उनपदेव हे पर्यटन स्थळाबरोबर धार्मिक क्षेत्रदेखील आहे. याठिकाणी सिद्धेश्वर महादेव मंदिर तसेच गोमुखातून २४ तास गरम पाण्याचा झरा वाहत असतो.
महाराष्ट्र राज्याच्या सर्वात शेवटचे टोक तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेलगत असलेला उनपदेव हा परिसर पर्यटकांसाठी व भाविकांसाठी एक प्रेक्षणीय स्थळ बनलेले आहे. या ठिकाणी गोमुखातून निघत असलेले गरम पाणी हे शरीरावर घेतल्यास अंगावर असलेल्या विविध आजाराची मुक्ती मिळते असे अशी अख्यायिका असल्याचे म्हटले गेलेले आहे. ब्रिटिश काळातील सिद्धेश्वर महादेव मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. गेल्या पाच-सात वर्षात अगोदर उनपदेव मंदिराला लागून सातपुडा पर्वत रांगेतून वाहणारी सुसरी नदीवर दरा मध्यम प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. या धरणात पावसाळ्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर साठा होत असतो. उनपदेवकडे जाणाºया रस्त्याच्या अगोदर डाव्या बाजूने या प्रकल्पाकडे जाण्याकरिता रस्ता आहे. प्रकल्पाजवळ गेल्यानंतर लांबच लांब पाणी दिसून येतं. प्रकल्पातील पाणी ओव्हरफ्लो होऊन सांडव्याद्वारे नदीतून वाहत असते. प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणावर सुट्टीच्या आनंद लुटण्यात करिता जात असतात. बाल गोपालपासून वयोवृद्ध व्यक्तिंपर्यंत सर्वच जण याठिकाणी पोहोचत असतात. संबंधित विभागाकडून पर्यटकांच्या सुरक्षेकरिता प्रकल्पाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संरक्षण कठडे बांधण्यात आलेले नाही.
उनपदेव धार्मिक व पर्यटन स्थळ असल्याकारणाने महिला-युवतीदेखील याठिकाणी येवून नैसर्गिक आनंद लुटत असतात. तसेच काही टवाळखोर युवक याठिकाणी येऊन मद्य पानाचा आनंद लुटत असतात. दरा मध्यम प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटकांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही युवक मद्यपान करून सोबत आणलेल्या बाटल्या व घाण याच ठिकाणी फेकून अस्वच्छता निर्माण करीत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने संचारबंदी जाहीर झाल्याने दररोज असंख्य नागरिक उनपदेव व दरा प्रकल्पाला भेट देण्यासाठी येवून तासनतास मनमुराद फिरण्याचा आणि पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात. परंतु प्रकल्पाला संरक्षण कठडे नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होवू शकतो. धोका पत्करत काही तरुण प्रकल्पावर फिरताना दिसून येतात. या प्रकल्पांवर संरक्षण कठड्यांसह सुरक्षा रक्षक ही नेमला नसल्याने धोका अधिक वाढला आहे. या संबंधी सिंचन प्रकल्प विभागाकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या सुरक्षतेची जबाबदारी संबंधित प्रशासनाकडे असताना प्रशासनाने काना डोळा केल्याचे दिसून येत असल्याने परिसरातील नागरिक व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.