दीड महिन्यापासून तोरणमाळची बससेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:41 IST2019-09-18T12:41:40+5:302019-09-18T12:41:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा ...

दीड महिन्यापासून तोरणमाळची बससेवा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : राज्यातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा दीड महिन्यापासून बंद आहे. परिणामी तोरणमाळसह अतिदुर्गम भागातील सुमारे 22 पाडय़ांवरील ग्रामस्थ व पर्यटकांना खाजगी प्रवासी वाहतूक सेवेवर अवलंबून रहावे लागत असून नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य परिवहन महामंडळाचे शहादा आगार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही बससेवा अद्याप सुरू झालेली नाही.
सातपुडा पर्वत रांगात 1 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. 2 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे राणीपूर ते तोरणमाळ या 36 किलोमीटर अंतरावरील घाट रस्त्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. जोर्पयत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोर्पयत बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय शहादा आगाराने घेतला होता. 2 ऑगस्टपासून या मार्गावरील बससेवा आजही बंद आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचा मलबा हटवण्यासाठी जेसीबी यंत्राच्या सहाय्याने काम करून रस्त्याची सुधारणा केली. मात्र सततच्या पावसामुळे या भागात दरडी कोसळण्याच्या घटना घडत होत्या. अखेर गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता मोकळा करण्यात विभागाला यश आले असले तरी येथील बससेवा मात्र अद्यापही बंद आहे. परिणामी या भागातील नागरिकांसह पर्यटकांना खासगी वाहतुकीवर अवलंबून रहावे लागत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे की, रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने तो प्रवासी वाहतुकीसाठी योग्य असल्यास त्यांनी तसे प्रमाणपत्र दिल्यानंतर या मार्गावरून बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता क्लिअरन्सबाबत कुठलेही प्रमाणपत्र दिलेले नसल्याने अद्यापही या मार्गावरील बससेवा बंद आहे. विशेष म्हणजे तोरणमाळ येथे जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ मिनी बसचा वापर करते. प्रती बस 12 हजार रुपये परमिट असा या बससेवेसाठी कर आहे. मात्र बससेवा बंद असतानाही हा कर भरावा लागत असल्याने शहादा आगाराला आर्थिक भरुदड सहन करावा लागत आहे.
सद्यस्थितीत रस्ता दुरुस्त झाल्याने तोरणमाळ ते राणीपूर-म्हसावद खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे. तोरणमाळच्या ग्रामस्थांना शहाद्याकडे येण्यासाठी सध्या याच वाहतूक सेवेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच खाजगी प्रवासी वाहतूकदार अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करीत असल्याने ग्रामस्थांना नाहक आर्थिक भरुदड सोसावा लागत आहे. या रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने व पर्यटकांची खासगी वाहने जाऊ शकतात तर बससेवा का सुरू होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र शहादा आगाराला का देत नाही याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
एकंदरीत सार्वजनिक बांधकाम विभाग व राज्य परिवहन मंडळाच्या शहादा आगार यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे या मार्गावर बससेवा कार्यान्वित होऊ शकलेली नाही व याचा नाहक जाच तोरणमाळच्या ग्रामस्थांसह पर्यटकांना सोसावा लागत आहे. या मार्गावरील बससेवा त्वरित पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांसह पर्यटकांनी केली आहे.