कोविड केअर सेंटर्समध्ये मिळतेय वेळेवर जेवण आणि वेळेवर नाष्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:55+5:302021-05-19T04:31:55+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे व्यवस्थेवर निर्माण झालेला ताण कमी झाला आहे. यातून ...

On-time meals and on-time snacks are available at Covid Care Centers | कोविड केअर सेंटर्समध्ये मिळतेय वेळेवर जेवण आणि वेळेवर नाष्टा

कोविड केअर सेंटर्समध्ये मिळतेय वेळेवर जेवण आणि वेळेवर नाष्टा

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे व्यवस्थेवर निर्माण झालेला ताण कमी झाला आहे. यातून कोविड केअर सेंटर्समध्ये रुग्णांना पुरवठा करणाऱ्या अन्नाचा दर्जा हा अधिक चांगला झाला असून, यामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

नंदुरबार शहरात दोन, नवापूर, प्रकाशा, ता. शहादा, तळोदा, खापर, धडगाव व मांडवी, ता. धडगाव याठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी एकूण ७३९ बेड तयार करून साैम्य लक्षणे असलेल्यांवर उपचार केले जात आहेत. तूर्तास याठिकाणी १५२ जण उपचार घेत असून, ५८७ बेड हे रिक्त आहेत. गेल्या काही महिन्यांत कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा देण्यावर भर देण्यात आला होता. यातून रुग्णांसाठी सकस आहार देणे हा एक महत्त्वाचा भाग होता. यात रुग्णाला सकाळी अंडी, केळी, चहा असा नाष्टा, तर दुपारी व रात्री चपाती, भाजी, डाळ व भात असा आहार दिला जात असल्याची माहिती देण्यात आली.

तापी कोविड सेंटर

नंदुरबार शहरातील तापी कोविड सेंटरमध्ये सध्या २४ रुग्ण ठेवण्यात आले आहेत. हे सर्व रुग्ण साैम्य लक्षणे असलेले आहेत. त्यांना सकाळी अंडी, केळी, चहा व दोन वेळचे जेवण दिले जात असल्याचे येथील रुग्णाने सांगितले.

तळोद्यातही सोय

तळोदा येथील कोविड सेंटरमध्ये १२ रुग्ण आहेत. सकाळी वेळेवर चहा आणि नाष्टा, तर दुपारी जेवण मिळत असल्याचे येथील रुग्णाने सांगितले. येथील १२ रुग्णही बरे झाले असून, घरी जाण्याच्या तयारीत आहेत.

खापर, ता. अक्कलकुवा

सातपुड्याच्या दुर्गम भागातील रुग्णांच्या सोयीसाठी खापर, ता. अक्कलकुवा येथे ४० बेडचा कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी नियमित अन्न पुरवठा होत आहे.

मांडवी

धडगाव तालुक्यातील मांडवी येथील कक्षातही योग्य पद्धतीने अन्न पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.

एकलव्य कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा चांगला

नंदुरबार शहरातील एकलव्य कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा चांगला असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी दोन वेळ जेवण, नाष्टा व चहा देण्यात येतो. रुग्णांना वेळेवर जेवण देण्यात येत असल्याचे तसेच ते चवदार असल्याचेही सांगण्यात आले.

जिल्हा रुग्णालयाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराला सीसीसीचे कंत्राट आहे. तालुकास्तरावर त्या-त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ठिकाणी चांगल्या दर्जाचे अन्न देण्याच्या सूचना केल्या आहेत. रुग्णांसोबतच याठिकाणी नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांनाही अन्न देण्याचा प्रयत्न केला जातो. चांगले व सकस अन्न देण्यावर भर दिला जातो.

-डाॅ. एन. डी. बोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.

Web Title: On-time meals and on-time snacks are available at Covid Care Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.