३३ वर्षात केवळ तीनवेळा दिसला ‘वाघ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:46 IST2020-07-29T12:46:32+5:302020-07-29T12:46:48+5:30

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याच्या क्षेत्रफळात ५४ टक्के क्षेत्र हे वनांनी व्यापले आहे़ यात सातपुड्यासह ...

'Tiger' seen only three times in 33 years | ३३ वर्षात केवळ तीनवेळा दिसला ‘वाघ’

३३ वर्षात केवळ तीनवेळा दिसला ‘वाघ’

भूषण रामराजे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्याच्या क्षेत्रफळात ५४ टक्के क्षेत्र हे वनांनी व्यापले आहे़ यात सातपुड्यासह नवापूर तालुक्याला स्पर्श करणाऱ्या वेस्टर्न घाटच्या कुशीतील वनक्षेत्राचा समावेश आहे़ या विस्तृत वनक्षेत्रात मात्र ३३ वर्षात केवळ तीन वेळा वाघ दिसल्याची नोंद आहे़ पोषक वातावरण असतानाही वाघाचा मुक्काम वाढत नसल्याने प्रस्तावित ‘टायगर कॉरिडोर’चे स्वप्न अधुरे राहणार आहे़
१९८५ मध्ये नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात वाघ दिसून आल्याची शेवटची नोंद वनविभागाने केली होती़ तत्पर्वूी सातपुड्याच्या वनक्षेत्रासह पश्चिम घाटाला लागून असलेल्या चिंचपाडा आणि डांग पट्ट्यालगत वाघांचा नियमित संचार असल्याची नोंद वनविभागाकडे आहे़ मात्र वनक्षेत्रातील घट, तुटलेली अन्न साखळी आणि शिकार यामुळे वाघांनी डांगच्या वनक्षेत्रात स्थलांतर करुन घेतले होते़ यानंतर ३३ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर जुलै २०१८ मध्ये कोकणीपाडा येथे वाघ आढळून आला होता़ वाट चुकल्याने याठिकाणी आलेल्या वाघाने किमान दोन दिवसांपेक्षा अधिक काळ येथे मुक्काम ठोकला होता़ परंतु मानवी वस्ती जवळ असल्याने वाघाने येथूनही काढता पाय घेतला असावा़ गेल्या दोन वर्षात आलेला हा वाघ नेमका गेला कुठे याचा शोध सुरू होता़ वनविभागाने दोन वर्षात ट्रॅप कॅमेरे, ड्रोन सर्वे यातून वाघाच्या अस्तित्त्वाच्या वाटा धुंडाळल्या जात होत्या़ परंतू वाघ आढळून आलेला नाही़
जिल्ह्यात बिबट, तरस, कोल्हे, अस्वल, चिंकारा, काळवी, निलगाय यासह विविध प्राण्यांची संख्या वाढली असली तरी वाघाचा संचार नाही़ यातून प्रस्तावित आहवा डांग वनक्षेत्रालगतच्या पट्ट्यात आकारास येऊ शकणारे टायगर कॉरीडोर प्रकल्प स्वप्न ठरणार आहे़ जिल्ह्यातील कोणत्याही वनक्षेत्रात आजघडीस वाघाचा संचार नाही़ यातून वनक्षेत्र समृद्ध असतानाही वाघाअभावी वनक्षेत्र सुने आहे़

कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे दिसून आलेला वाघ नवापूर तालुक्यात परत गेल्याचे वनविभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले होते़ जुलै २०१८ मध्ये दिसून आलेला हा वाघ शेवटी आॅगस्ट २०१८ मध्ये कोंडाईबारी ता़ नवापूर येथील घाटात दिसून आला होता़ कोकणीपाड्यात आढळलेला हाच तो वाघ असल्याचा अहवाल वनविभागाने दिला होता़ येथून पुढे मात्र वाघाचा संचार असल्याचे समोर आलेले नाही़

नंदुरबार व नवापूर तालुक्याच्या वनक्षेत्रात वाघासाठी नैसर्गिक अन्नसाखळी आहे़ यातून त्यांचा रहिवास होवू शकतो़ पोषक असे वातावरण आहे़ यापूर्वी या भागात वाघाचा संचार होता़
-जी़आऱरणदिवे, सहायक वनसंरक्षक, नंदुरबाऱ

Web Title: 'Tiger' seen only three times in 33 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.