महामार्गावर बर्निंग बसचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 21:44 IST2020-11-17T21:44:06+5:302020-11-17T21:44:13+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :  धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर  विसरवाडी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ...

The thrill of a burning bus on the highway | महामार्गावर बर्निंग बसचा थरार

महामार्गावर बर्निंग बसचा थरार

 लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी :  धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्ग सहावर  विसरवाडी पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी निमदर्डा  फाट्याजवळ धावत्या लक्झरी बस ने पेट घेतला.  चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचून त्यांना बर्निंग बसचा अनुभव आला. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.  
 औरंगाबाद येथून  एम.एच. ४० ए.टी २९२९ बस नवापूर मार्गाने सुरतकडे निघाली होती. दरम्यान सोमवारी पहाटे  तीन वाजेच्या सुमारास निमदर्डा गावाच्या फाट्याजवळ आल्यावर बसमध्ये काही जळत असल्याचा वास आल्याची तक्रार एका प्रवाशाने चालक दलजीत सिंग याच्याकडे केली होती. चालक दलजीत सिंग याने मागे वळून पाहिले असता मागील बाजूस आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे त्यास दिसून आले. प्रसंगावधान राखत चालकाने गाडी रस्त्यात थांबवत सर्वांना खाली उतरवून सामान काढण्याच्या सूचना केल्या. प्रवाशांनीही तातडीने बसमधून उतरुन सामान घेत सुरक्षित जागा पटकावली. यानंतर अवघ्या काही क्षणात बसने पूर्णपणे पेट घेतला होता. चालकासह प्रवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू आग आटोक्यात आली नाही. पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर महामार्ग मदत केंद्रावरील पोलीस कर्मचारी, विसरवाडी पोलीसांचे पथक घटनास्थळी हजर झाले होते. नवापूर येथून अग्नीशमन बंबही बोलावण्यात आला होता. परंतू बंब पोहोचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. दरम्यान बसमध्ये काही प्रवाशांचे सामान जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीमुळे बसचे २० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. 
याप्रकरणी चालक दलजीत सिंग  यांनी दिलेल्या खबरीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात अग्नि उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कृष्णा पवार हे करीत आहेत. दरम्यान महामार्गावर सलग अपघातांची मालिका सुरू आहे. कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. गेल्या दीड महिन्यात कोंडाईबारी घाटात दोन भीषण अपघात घडले होते. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे भिती व्यक्त होत आहे. 

Web Title: The thrill of a burning bus on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.