गोगापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 12:18 IST2018-10-06T12:18:03+5:302018-10-06T12:18:09+5:30
गोगापूरला खळबळ : बंद घराची संधी साधत चोरटय़ांनी मारला हात

गोगापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील गोगापूर येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घर फोडी झाली. चोरटय़ांनी दोन तोळे सोने व 10 हजाराची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
शहादा तालुक्यातील गोगापूर येथे गुरुवारी रात्री तीन घरफोडय़ा झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोगापूर येथील आशाबाई प्रल्हाद पाटील या आपल्या घराला कुलूप लावून आपल्या मुलीकडे नंदुरबार येथे गेलेल्या होत्या याची संधीचा फायदा घेऊन गुरुवारी रात्री चोरट्यानी घराचे कुलूप कापून हात साफ केले. यावेळी घरातील लोखंडी कपाट उघडून सर्व कपडे व सामान फेकून दिले. कपाटातील दोन तोळे सोने, दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला. या घरासमोरीलच जाधव कानजी पाटील यांचा बंद घराचे कुलूप त्याच पद्धतीने कापले. घरमालक तीन दिवसापूर्वी दमन येथे गेले असल्याने चोरांनी काय लंपास केले कळू शकले नाही. त्याच गल्लीतील हाकेच्या अंतरावरील मायाबाई रमण पाटील ह्या गेल्या महिनाभरापासून अमेरिकेत आपल्या मुलीकडे गेल्या आहेत. चोरट्यानी लोखंडी गेटचे कुलूप त्याच पद्धतीने कापून घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तेथूनही चोरी करण्यात आली. परंतु घर मालक गेल्या महिनाभरापासून अमेरिका येथे गेलेले असल्यामुळे चोरट्यांनी काय चोरून नेले याबाबत समजू शकले नाही.शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीस वर्षा नंतर घटना
गोगापूर येथे 1976 साली सुरेश सजन पाटील यांच्या घरी धाडसी घर फोडीत 20 तोळे सोने व रोकड लंपास झाल्याची घटना घडली होती. 40 वर्षा नंतर गोगापूर येथे धाडसी चोरीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.