शहाद्यात किरकोळ कारणातून दगडफेक, तीन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 21:26 IST2020-09-20T21:26:19+5:302020-09-20T21:26:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील एकलव्य नगर भागात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गटात वाद ...

शहाद्यात किरकोळ कारणातून दगडफेक, तीन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील टेक भिलाटी परिसरातील एकलव्य नगर भागात सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोन गटात वाद होऊन मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यात दोन ते तीन जण जखमी झाले असून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त लावला आहे.
टेक भिलाटी या आदिवासीबहुल भागात सायंकाळी किरकोळ कारणावरून दोन गटात शाब्दिक चकमक झाली. वादावादी झाल्यानंतर परिसरात शांतता निर्माण झाली होती. मात्र, साडेसात वाजेच्या सुमारास अचानक या भागातील काही घरांवर तुफान दगडफेक सुरू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक दगडफेक सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड धावपळ उडाली या दगडफेकीत दोन ते तीन युवक जखमी झाले आहेत.
अचानक तणावाची परिस्थिती निर्माण झाली व दगडफेक सुरू झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. पोलीस येण्यापूर्वीच दगडफेक करणारे हल्लेखोर पसार झाले होते. सर्वत्र धावपळ सुरू झाली यात काही महिला व लहान बालकांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती परिसरातील महिलांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी टेक भिलाटी व एकलव्य नगर परिसरात मोठा बंदोबस्त लावला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. तर शहरातील अब्दुल हमीद चौक गरीब नवाज कॉलनी परिसर तकिया बाजार खेतिया रोड गौसिया नगर आदी भागात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागात हल्लेखोरांची चौकशी सुरू केली असली तरी घटनेचे मूळ कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.