टँकर दरीत कोसळून तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:49 IST2019-03-31T11:48:38+5:302019-03-31T11:49:02+5:30
पोलीसांचे मदतकार्य : कोंडाईबारी घाटातील अपघात

टँकर दरीत कोसळून तिघे जखमी
विसरवाडी : भरधाव टँकर पहाटे दरीत कोसळून तीनजण जखमी झाल्याची घटना विसरवाडीनजीक कोंडाईबारी घाटात घडली. दरम्यान, वेळीच महामार्ग पोलिसांनी धाव घेतल्याने चालकासह तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
धुळ्याकडून सुरतकडे जाणारे तेलाचे टँकर (क्रमांक जीजे-12 एङोड 9503) पहाटे साडेपाच वाजता अचानक कोंडाईबारी घाटातील पुलावरून 30 ते 35 फूट खाली कोसळले. याच ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम देखील सुरू आहे. पुलाच्या पिलरजवळच टँकर कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी तातडीने नजीकच्या महामार्ग पोलीस चौकीला याबाबत कळविले. महामार्ग पोलीस हवालदार संजय माळी, पाटील व हेमकांत कुमावत हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल जागेवर उतरून मिळेल त्या साधनांनी तिघा जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना विसरवाडी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील याच परिसरात ट्रॉला कोसळला होता. रात्री झालेल्या अपघाताची घटना सकाळी उघडकीस आली होती. त्यात चालक जागीच ठार झाला होता. आता ही दुसरी घटना घडली आहे. महामार्गाचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्यामुळे या रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अपघात होत आहेत. यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.