नंदुरबार नगर पालिकेला तीन कोटीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 12:38 IST2020-07-29T12:38:25+5:302020-07-29T12:38:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्चअखेर किमान ८० टक्के मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेला कोरोनामुळे पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनचा ...

नंदुरबार नगर पालिकेला तीन कोटीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मार्चअखेर किमान ८० टक्के मालमत्ता कराची वसुली करणाऱ्या नंदुरबार नगरपालिकेला कोरोनामुळे पाळण्यात आलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे़ यातून २०१९-२० या आर्थिक वर्षात पालिकेच्या वसुलीत तीन कोटी रूपयांची घट आली असून कोरोनामुळे नवीन आर्थिक वर्षातही कर भरणा करण्यास नागरिकांचा अल्प प्रतिसाद आहे़
राज्यभरात विकासकामे आणि वसुली यांचा समन्वय साधत ‘अ’ दर्जा मिळालेल्या नंदुरबार नगरपालिकेची वसुली मार्च अखेरपर्यंत ही किमान ११ ते १३ कोटींच्या घरात असते़ परंतु २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष संपत असतानाच लॉकडाऊन सुरू झाल्याने पालिकेकडे गोळा होणारा हा महसूल थांबला होता़ यातून पालिकेच्या गोळा-बेरीजमध्ये मोठा फरक पडला आहे़ साधारण १३ प्रभाग असलेल्या नंदुरबार नगरपालिका क्षेत्रांतर्गत ३२ हजार मालमत्ताधारक विविध कराचा भरणा करतात़ यात पाणीपट्टी, घरपट्टी, बखळ प्लॉटचा कर यांचा समावेश असतो़ पालिका हद्दीतील शासकीय कार्यालयांच्या इमारतींचा करही पालिकेत जमा करण्यात येतो़ परंतु गत तीन महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे पालिकेत होणाºया विविध करांचा भरणा थांबला आहे़ प्रशासनाने पालिका इमारतीतच भरणा करण्याची व्यवस्था केली असली तरी याठिकाणी नागरिक फिरकत नसल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षात थकीत रकमेची वसुली करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना नव्याने सुरूवात करावी लागणार आहे़
दरम्यान वसुली विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोना सर्वेक्षण व इतर कामांची जबाबदारी देण्यात आल्याने या करांची वसुली रखडली असल्याचेही सांगण्यात आले आहे़
कर्मचारी वसुलीसाठी प्रयत्नशील
लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी पालिका वसुली विभागाने १३ प्रभागात थकबाकीदारांना नोटीसा देत नळ कनेक्शन कापणे व जप्ती करण्याचे सूचीत केले होते़ मात्र कोरोनामुळे नोटींसावर पुढे कारवाई होवू शकली नाही़ वसुली विभागाने विविध दूरसंचार कंपन्यांच्या टॉवरचा कर वसुलीसाठी प्रयत्न चालवला आहे़ यातील काही कंपन्यांकडून भरणा करण्यात आल्याची माहिती आहे़
३२ हजार मालमत्ताधारक
1 नगरपालिका हद्दीत ३२ हजार ३९६ मालमत्ताधारक आहेत २०१९-२०२० या आर्थिक वर्षात या मालमत्ताधारकांकडून ९ कोटी ९६ लाख ७७ हजार रूपयांची वसुली झाली आहे़ ही वसुली मार्च फेब्रुवारी २०२०च्या अखेरपर्यंतची आहे़ कोरोना महामारीला सुरूवात झाल्यानंतर पालिकेत कर भरणा करण्यासाठी येणाºयांची संख्या कमी होवून तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे़
2 लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही काळ बंद असलेला कर भरणा एप्रिलमध्ये सुरू झाला होता़ यातून या महिन्यात ५७ हजार ७८३ रुपयांची वसुली होवू शकली़ मे महिन्यात ४ लाख ९६ हजार तर जून महिन्यात १६ लाख ४१ हजार ९४७ रूपयांचा भरणा करण्यात आला आहे़
3 पालिकेकडून बिल दिल्याच्या एक महिन्याच्या आत कर भरणाºयांना १० टक्के, दोन महिन्याच्या आत भरणाºयांना आठ तर तीन महिन्याच्या आत कर भरणाºयांना पाच टक्के सूट देण्यात येते़ यामुळे शहरातील अनेक जण तातडीने कर भरणा करण्यावरही भर देतात़
कोरोनामुळे कर्मचारी सध्या आरोग्य विभागाच्या मदतीला आहेत़ कोरोनाचा संसर्ग कमी होवून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर वसुलीसाठी नियोजन करणार आहे़ अद्यापही यावर चर्चा सुरू असून लवकरच वसुलीत वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहू़
-राहुल वाघ, प्रभारी मुख्याधिकारी,
नगरपालिका, नंदुरबार
नंदुरबार पालिकेडून येत्या दोन महिन्यात मोहिम सुरू करुन वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आहे़