तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको
By मनोज शेलार | Updated: September 12, 2023 17:12 IST2023-09-12T17:11:13+5:302023-09-12T17:12:27+5:30
त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको
नंदुरबार : गेल्या २३ वर्षांपासून रखडलेली व दोन जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी तापी-बुराई उपसा योजनेचे काम मार्गी लागावे या मागणीसाठी ३० गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता चिनावलकर यांनी सुधारीत प्रस्ताव पाठवून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तापी नदीतून पाणी उचलून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीत पाणी टाकण्याची ही योजना असून या योजनेत नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र २३ वर्षांपासून ही योजना रखडली आहे. यंदाची दुष्काळी स्थिती पहाता या योजनेसाठी शेतकरी आग्रही आहेत. त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क प्रमुख दिपक गवते, बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, धुळ्याचे शाम सनेर, संघर्ष समितीचे दीपक पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी शेतक्यांना मार्गदर्शन केले. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी सहा महिन्याच्या आत सुधारीत प्रस्ताव सादर करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.