शहाद्यात कोरोनाची हजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 11:51 IST2020-09-07T11:51:18+5:302020-09-07T11:51:27+5:30
हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून ग्रामीण भागात ...

शहाद्यात कोरोनाची हजारी
हिरालाल रोकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरासह तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून ग्रामीण भागात रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या जुलै व आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. सद्यस्थितीत ९८८ बाधित रुग्ण आढळून आले असून पैकी २३ मयत झाले आहेत तर ५०७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. ३०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णवाढीचा वेग पाहता लवकरच ही संख्या एक हजारापेक्षा अधिक होईल. कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनासह नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
२२ एप्रिलला शहरात प्रभाग क्रमांक सातमध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. २९ एप्रिलपर्यंत ही संख्या दहा झाली. दुर्दैवाने पहिला बाधित रुग्ण हा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना अवघ्या तीन दिवसात दगावल्याने संपूर्ण शहर व प्रशासन भयभीत झाले होते. केवळ दहा दिवसाच्या कालावधीत रुग्ण संख्या शहरात वाढल्याने प्रशासनाने कठोर उपाययोजना करीत कोरोना साखळी रोखण्यासाठी प्रयत्न केले. याचा बराच फायदा झाला. केंद्र व राज्य शासनाने जाहीर केलेले सक्तीचे लॉकडाऊन व प्रशासनाच्या उपायोजना यामुळे २१ मेपर्यंत सर्व बाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाल्याने प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता मात्र
अवघ्या आठ दिवसानंतर कोरोनामुक्त झालेल्या शहरात २९ मे रोजी पुन्हा बाधित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली.
जून महिन्याच्या मध्यवर्ती काळात शहरातील काही भागात मर्यादित असलेल्या कोरोना विषाणूचे संक्रमण ग्रामीण भागात पसरले. जून महिन्याच्या अखेरपर्यंत रुग्ण संख्या ही ५० झाली. प्रशासन आपल्या परीने उपाययोजना करीत होते. शहरातील स्वयंसेवी संस्था कोरोना विषाणूबाबत शहरात जनजागृती अभियान राबविण्यात होते. याचा परिणाम बऱ्यापैकी जाणवत असताना अचानक केंद्र शासनाने अनलॉक-१ जाहीर केले. यामुळे एकीकडे शहरात तीन महिने बंद असलेले उद्योग-व्यवसाय हळूहळू सुरू होत जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. मात्र दुर्दैवाने जुलै महिन्यात रुग्णसंख्या सर्वाधिक वाढली. सुमारे ४०० रुग्णसंख्या जुलैमध्ये वाढली तर आॅगस्ट महिन्यात ५०० रुग्ण वाढले. शहरातील सर्वच वसाहतीमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात वडाळी, अनरद, सोनवद, कळंबू, पाडळदा या प्रमुख गावांसह ग्रामीण भागात वेगाने कोरोनाचे संक्रमण वाढायला सुरू झाल्याने संपूर्ण यंत्रणेवर ताण वाढला. ५ सप्टेंबरपर्यंत तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ९३१ झाली होती.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाने शहादा येथे मोहिदा शिवारात शासकीय वसतिगृहाच्या इमारतीत सुमारे १२० बेडचे कोविड सेंटर सुरू केले. येथे संशयित रुग्णांचे नमुने घेण्यासाठी विशेष व्यवस्था केली. त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेल्या बाधीतांवर उपचार केंद्रही सुरू केले. बाधित रुग्ण ज्याठिकाणी आढळून येईल त्याठिकाणी स्थानिक प्रशासनाला सोबत घेत परिसर निर्जंतुकीकरण करणे, बाधिताच्या संपर्कात असलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करणे व बाधिताला उपचारासाठी दाखल करणे आदी प्रयत्न प्रशासनाने केले. यातच नागरिकांचे अपेक्षित सहकार्य काही ठिकाणी प्रशासनाला मिळाले नसल्याने विशेषत: ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढण्याचा वेग कमालीचा झाला आहे.
जिल्ह्यात शहादा तालुका बाधितांच्या संख्येबाबत क्रमांक दोनला येऊन ठेपला आहे. तालुक्यातील अनेक गावे कोरोना हॉटस्पॉट ठरली आहेत. कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून महसूल, आरोग्य, पोलीस व पालिका प्रशासन अविरत परिश्रम घेत आहेत. परिणामी या यंत्रणांवर कमालीचा ताण वाढला आहे. शहादा पोलीस दल व कोविड केअर सेंटर त्याचप्रमाणे पालिकेचे कर्मचारी कोरोना बाधीत आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रशासनानेही काही कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे गरजेचे आहे अन्यथा रुग्णवाढीचा लक्षणीय वेग पाहता भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.