कोरोनाबाबत सूचना न पाळणाऱ्यांना वर्षभरात अडीच कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST2021-04-20T04:31:47+5:302021-04-20T04:31:47+5:30
कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना ...

कोरोनाबाबत सूचना न पाळणाऱ्यांना वर्षभरात अडीच कोटींचा दंड
कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना अनेक ठिकाणी पोलिसांमधल्या माणुसकीचेही दर्शन घडले. गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्ध आणि निराधारांना सहकार्य, नागरिकांना मार्गदर्शनातही पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. या कालावधीत तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि इतर काहींना कोरोनाशी झुंज द्यावी लागली. पण, पोलिसांनी आपले कर्तव्य कठोरपणे पार पाडले.
लॉकडाऊन असो वा जनता कर्फ्यू, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. नियम तोडणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत अनावश्यक रस्त्यावर फिरणारे, मास्क न घालणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणारे, संचारबंदी मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील केली. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत कोविड नियमांच्या उल्लंघनाबाबत सहा हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सहा हजार ६१७ व्यक्तींकडून ३१ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मास्क न लावणाऱ्या २६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना ६० लाख ५६ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या एक लाख २१ हजार ९५१ प्रकरणांत एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.
पोलीस हा नागरिकांचा मित्र आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व मिळूनच कोरोनावर मात करता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने यापुढेदेखील नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलीसमित्र म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.