काटेरी झुडपांमुळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:22 IST2021-06-25T04:22:10+5:302021-06-25T04:22:10+5:30
सारंगखेडा, कळंबू ते कुकावल या सहा किलोमीटर अंतरादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहन जवळ येईपर्यंत लक्षात ...

काटेरी झुडपांमुळे रस्ता बनला मृत्यूचा सापळा
सारंगखेडा, कळंबू ते कुकावल या सहा किलोमीटर अंतरादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे वाढल्याने वाहन जवळ येईपर्यंत लक्षात येत नसल्याने वाहनधारक अपघातास बळी पडत आहेत. कळंबू रस्त्यावरील वाघेश्वरी माता मंदिराजवळील वळणावर काटेरी झुडपे व वाढलेल्या गवतामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांनी एकमेकांना धडक दिल्याने गेल्यावर्षी अपघात झाला होता. या अपघातात कळंबू व धडगाव येथील दोन युवक गंभीर जखमी झाले होते, तसेच गेल्या सहा महिन्यांपूर्वी कळंबू येथील बीज गुणन केंद्राजवळच्या वळणावर चारचाकी व दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार तरुणाला जीव गमवावा लागला, तर सोबत असलेल्या दोन तरुणांना गंभीर दुखापती होऊन कायमचे अपंगत्व आले. येथे वारंवार लहान-मोठे अपघात काटेरी झुडपांमुळे होत असल्याने हा रस्ता जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून निरपराधाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल प्रवासी व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. याबाबत वेळीच विचार करून रस्त्याच्या दुतर्फा, साईडपट्टीवरील गवत व काटेरी झुडपे जेसीबीच्या साहाय्याने काढून पाईप चारीवरील रस्ता दुरुस्ती करावा, अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रस्ता खोदून शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तापी नदीवरून जलवाहिनी शेतापर्यंत आणली आहे. मात्र, रस्त्याच्या जलवाहिनीवरील भराव खचल्याने येथे मोठी चारी होऊन त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचा सराव झाल्याने ते सावधपणे वाहन चालवतात. नवीन वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा व काटेरी झुडपांमुळे वळण रस्त्याचा अंदाज येत नसल्याने ते येथे अपघाताला बळी पडतात.
रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपांबद्दल संबंधित विभागाचे कायमस्वरूपी दुर्लक्ष असते, असे का ? येथे वारंवार लहान-मोठे अपघात होऊनही संबंधित विभागाला जाग येत नसेल तर हे दुर्दैव समजावे लागेल.
-कल्पेश कुवर, ट्रॅक्टर चालक, कळंबू, ता. शहादा.