शिवभोजनाच्या १३ केंद्रांना मिळाले वर्षभरात सव्वा कोटींचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:10 IST2021-02-05T08:10:11+5:302021-02-05T08:10:11+5:30
भोजनालय सुरू करण्यासाठी सुरू असलेली खानावळ, बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यातून सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली. जिल्हा ...

शिवभोजनाच्या १३ केंद्रांना मिळाले वर्षभरात सव्वा कोटींचे अनुदान
भोजनालय सुरू करण्यासाठी सुरू असलेली खानावळ, बचत गट, रेस्टॉरंट किंवा मेस यातून सक्षम असलेल्या भोजनालयाची निवड करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, बाजारपेठ, शासकीय कार्यालय अशा ठिकाणी भोजनालय सुरू करण्यात आले. जिल्ह्यात सद्य:स्थितीत नंदुरबार शहरात तीन, शहादा दोन, तळोदा दोन, अक्कलकुवा दोन, नवापूर दोन आणि धडगाव येथे दोन अशी एकूण १३ भोजनालये सुरू आहेत. ११ भोजनालयातून प्रतिदिन १०० थाळ्यांचे वितरण करता येते, तर नंदुरबार येथील दोन भोजनालयांत २०० थाळ्यांचे वितरण करण्यात येते.
आतापर्यंत नंदुरबार शहरात एक लाख ३६ हजार ६८२, शहादा ६३ हजार ३८५, तळोदा ६३ हजार ८३१, अक्कलकुवा ४६ हजार २८१, नवापूर ५३ हजार ८३४ आणि धडगाव येथे ५१ हजार ७७१ अशा एकूण चार लाख १५ हजार ७८४ थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. विशेषत: ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी या योजनेचा चांगला लाभ झाला आहे.
शहरी भागात थाळीची किंमत ५० रुपये आणि ग्रामीण भागत ३५ रुपये निश्चित करण्यात आली आहे. सुरुवातीला ग्राहकांकडून दहा रुपये घेऊन इतर रक्कम अनुदानाच्या स्वरूपात भोजनालय चालकाला देण्यात येत असे. कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार गेले, अनेक मजुरांचे स्थलांतर झाल. अशा परिस्थितीत दिलासा देण्यासाठी ग्राहकांसाठी थाळीची किंमत केवळ पाच रुपये करण्यात आली.
नंदुरबार जिल्ह्यात शासनातर्फे आतापर्यंत शिवभोजन थाळीसाठी एक कोटी २० लाख २७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. राज्यातदेखील एकूण ९०५ केंद्रातून तीन कोटींपेक्षा अधिक नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भाग असणाऱ्या नंदुरबारसारख्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही योजना महत्त्वाची ठरली आहे. विशेषत: धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांना ही योजना दिलासादायक ठरली आहे.