तळोदा येथील घरफोडीतील चोरटा जेरबंद, ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 12:31 IST2020-08-10T12:30:50+5:302020-08-10T12:31:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यात झालेल्या घरफोडी आणि मोबाईल चोरीतील संशयीताच एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून ८३ हजाराचा ...

तळोदा येथील घरफोडीतील चोरटा जेरबंद, ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यात झालेल्या घरफोडी आणि मोबाईल चोरीतील संशयीताच एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचे इतर दोन साथीदार फरार झाले आहेत. या संशयीताकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलीस सूत्रांनुसार, गोपाळपूर पुनर्वसन येथील बाज्या सिंगला वसावे यांच्या उघड्या घरातून ४ आॅगस्ट रोजी चोरी झाली होती. चोरट्यांनी ४४ हजार रुपये रोख व दहा हजाराचे दागीने चोरून नेले होते. याबाबत तळोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास एलसीबीनेही सुरू केला होता. त्याच अनुषंगाने निरिक्षक किशोर नवले यांना तळोदा येथील स्मारक चौकात एक युवक महागडे मोबाईल कमी किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. नवले यांनी त्या ठिकाणी पथक पाठविले. डमी ग्राहक बनून त्या युवकाकडे पथकातील एकाने मोबाईल खरेदीचा बहाणा केला. त्यावेळी त्यांची खात्री पटल्यानंतर पथकाने त्याला तेथे ताब्यात घेतले.
त्याची अधीक चौकशी केली असता तो पवन उत्तम पाडवी (२२) रा.लक्कडकोट, ता.तळोदा असल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असलेल्या व विक्री करीत असलेल्या मोबाईलबाबत विचारणा केली असता त्याने मोबाईलची चोरी रांझणी, गोपाळपूरपुनर्वन व इतर ठिकाणी केल्याचे सांगितले. तसेच गोपाळपूर पुनर्वसन येथील घरफोडी देखील केल्याचे सांगितले. त्याच्यासोबत दिवानज्या गुलाबसिंग वळवी व दिपक पारता पावरा, रा.गडीकोडठा, ता.तळोदा हे देखील असल्याचे सांगितले.
गोपाळपूर येथील चोरी उघड्या घरातून लोखंडी पेटी घेऊन पोबारा करून केली. ऐवज काढून घेत पेटी स्मशानभूमीजवळ फेकून दिल्याचे सांगितले. त्याचे इतर दोन्ही साथीदार फरार झाले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक किशोर नवले, जमादार अनिल गोसावी, मुकेश तावडे, योगेश सोनवणे, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, मनोज नाईक, मोहन ढमढेरे यांनी केली.