काहीही न करता लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि फसगत झाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:33 IST2021-08-19T04:33:49+5:302021-08-19T04:33:49+5:30
नंदुरबार : समाजमाध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार वाढलेले असताना, आता ई-मेलद्वारेदेखील फसवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. लॉटरी लागल्याचा ...

काहीही न करता लॉटरी लागल्याचा ई-मेल आला आणि फसगत झाली!
नंदुरबार : समाजमाध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार वाढलेले असताना, आता ई-मेलद्वारेदेखील फसवणूक केली जात असल्याचे चित्र आहे. लॉटरी लागल्याचा मेल आल्यावर सामान्य माणूस सहज मेल ओपन करतो आणि तेथेच फसतो. काही घटनांची नोंद होते, तर काही घटनांबाबत संबंधितांची उदासीनता दिसून येते. जिल्ह्यातदेखील अशाप्रकारे अनेकांची फसवणूक झाली असून, तक्रारी सायबर सेलकडे आल्या आहेत. त्यामुळे बनावट मेलपासून सावध राहण्याचा इशारा यापूर्वीच नंदुरबार पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे.
केस १ : केबीसीमध्ये आपल्याला बक्षीस लागले असून, अमूक रक्कम आपण जिंकल्याचा ई-मेल नंदुरबारातील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला आला होता. त्यांनी सहज पडताळणी केली, तर संबंधितांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रक्कम हडप केली.
केस २ : एका महिलेला आपला मोबाईल नंबर लकी असून, लॅाटरी लागल्याचा ई-मेल आला. महिलेने त्यावर विश्वास ठेवून ई-मेलकर्त्याने विचारलेली सर्व माहिती पुरविली आणि फसगत झाली. सुदैवाने लवकरच प्रकार लक्षात आल्याने मोठी रक्कम जाण्यापासून वाचता आले.
ही घ्या काळजी
आपल्याला येणाऱ्या ई-मेलची तपासणी वेळोवेळी करायला हवी़, अनावश्यक मेसेज दुर्लक्षित करावेत़
आपल्याला लॉटरी लागल्याचा मेसेज आल्यास त्याला प्रतिसाद न देता त्याची खातरजमा करायला हवी़
कोणत्याही आणि आक्षेपार्ह ई-मेलद्वारे आलेल्या मेसेजची पडताळणी केल्याशिवाय प्रतिसाद देणे निरर्थक आहे. अशाप्रकारच्या मेलद्वारे आपल्याला लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून लुबाडण्याचा समोरच्याचा डाव असू शकतो.