दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होतेय शाळांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:25 IST2021-01-30T12:25:32+5:302021-01-30T12:25:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस ...

दहावी-बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी होतेय शाळांची कसरत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दहावी व बारावी परीक्षांच्या संभांव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची सिलॅबस पुर्ण करण्याची धडपड सुरू झाली आहे. सिलॅबस पुर्ण करणे, सराव परीक्षा घेणे, प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याची कसरत करावी लागणार आहे.
दहावी व बारावीच्या वर्गांना यंदा अनेक अडथळे आले. पहिले सत्र तर केवळ ॲानलाईन शिकविण्यावर गेले. २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या. त्यानंतर अभ्यासक्रमाची गाडी थोडीफार रुळावर आली. गेल्या दीड महिन्यात बऱ्यापैकी अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. आता येत्या दीड ते दोन महिन्यात उर्वरित अभ्याक्रम पुर्ण करण्यासाठी कसरत होत आहे. विद्यार्थी देखील घोकंपट्टी करीत आहेत. जास्तीत जास्त अभ्यासक्रम पुर्ण व्हावा व त्याची रिव्हजन व्हावी यासाठी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.
सिलॅबस पुर्ण होणार...
दहावीचा सिलॅबस पुर्ण करण्यासाठी शिक्षकांचा पुर्ण प्रयत्न सुरू आहे. २५ टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा आहे. प्रत्यक्ष शिकविण्यासाठी साडेतीन ते चार महिने मिळत आहेत.
नवीन सिलॅबसमुळे अडचण
बारावीचा यंदापासून नवीन सिलॅबस आहे. त्यामुळे सुरुवातीला अडचणी आल्या. नंतर मात्र, २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे वेळेत सिलॅबस पुर्ण करण्याकडे कल आहे.
सराव परीक्षा होणार...
लवकरात लवकर अभ्यासक्रम पुर्ण करून सराव परीक्षा घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. विषय शिक्षक काही वेळा अतिरिक्त तासिका देखील घेत आहेत. आता पालकांनी पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने शाळेत पाठवावे, जेणेकरून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
कमी झालेला अभ्यासक्रम, ॲानलाईनमुळे आलेला सुटसुटीतपणा यामुळे दहावीचा अभ्यसक्रम पुर्ण करण्याकडे कल आहे. नियमित सराव परीक्षा, रिव्हजन घेतले जाईल. पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठवून सहकार्य करावे.
-भारती सूर्यवंशी,
मुख्याध्यापिका, नंदुरबार
शाळेकडून अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त तासिका देखील घेतल्या जात आहेत. आता लवकरच सराव परिक्षांना सुरुवात होईल. त्यामुळे ताण काहीसा हलका झाला आहे.
-सुनील पवार, विद्यार्थी, दहावी.
यंदा अभ्यासक्रम बदलला, त्यातच पहिले टर्म घरी बसून शिकावे लागले. आता प्रत्यक्षात वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाचा बराचसा ताण कमी झाला आहे. त्यामुळे फारशा अडचणी येणार नाहीत.
-ललिता पाटील,विद्यार्थीनी,बारावी.