तळोद्यात ७२ निराधारांच्या कोरोना चाचणीत एकही पाॉझिटिव्ह नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:22+5:302021-04-23T04:33:22+5:30
येथील आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात रुग्णांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्यासाठी शहाराबरोबरच ग्रामीण भागात तंबूदेखील लावले आहेत. तालुका ...

तळोद्यात ७२ निराधारांच्या कोरोना चाचणीत एकही पाॉझिटिव्ह नाही
येथील आरोग्य विभागाने मोठ्या प्रमाणात रुग्णांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. त्यासाठी शहाराबरोबरच ग्रामीण भागात तंबूदेखील लावले आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण व त्यांच्या पथकाने जे गरीब लोक जेवणासाठी शहरातील शासकीय शिवभोजन केंद्रावर थाळी घेण्यासाठी येतात त्यांची कोरोना चाचणी घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार स्वतः ते केंद्रात जाऊन मोफत कोरोना चाचणीबाबत जागृती, मार्गदर्शन केले होते. साहजिकच हे नागरिक तपासणीसाठी तयार झाले. पथकाने त्यांची अँटिजेन चाचणी केली. सुदैवाने एकहीजण पाॅझिटिव्ह आढळून आले नाहीत. त्यांना कोरोनाबाबत समुदेशन व रोगाची गंभीरताबाबत महत्त्व पटवून दिल्यानंतर स्वखुशीने रॅपिड अँटिजेन टेस्ट केली.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. तुषार पटेल, जगदीश नाईक, आरोग्यसेवक प्रकाश चौधरी, आरोग्य सहायक सी. जी. बोरसे, आरोग्यसेवक सुनील गोजरे, नगरपालिका कर्मचारी, आदींनी तपासणीसाठी सहकार्य केले.
कोरोनाचे एवढे गंभीर वातावरण असताना ज्यांना जेवणाची शाश्वती नाही असे लोक अगदी हसत खेळत... कोणी फिल्मी स्टाईलमध्ये गाणे गात, कोणी फिल्मी कलाकाराची नकल करीत तपासणी करून घेतली. ज्यांना एकवेळच्या जेवणाची चिंता आहे अशा गोरगरीब लोकांपैकी रॅपिड अँटिजेन चाचणीत एकही जण पाॅझिटिव्ह आढळून आला नाही, ही समाधानाची बाब आहे.