नदीवर पूल नसल्याने कौलीमाळ ग्रामस्थांची पाण्यातून वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 12:29 IST2020-08-23T12:29:33+5:302020-08-23T12:29:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कौलवीमाल ते ओहवापाडा नदीवर पूल नसल्याने खापर व ...

नदीवर पूल नसल्याने कौलीमाळ ग्रामस्थांची पाण्यातून वाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील कौलवीमाल ते ओहवापाडा नदीवर पूल नसल्याने खापर व अक्कलकुवा येथे बाजारासाठी येणाऱ्या तालुक्यातील ओहवापाडा, गोरजाबारीपाडा, कौलवीमाळपाडा, खाईपाडा या पाड्यातील नागरिकांना ही देवनदीओलांडून यावे लागत असल्याने बाजार करून घरी परतत असताना नदीला पाणी आल्याने जीवमुठीत धरून नदी पार करावी लागत असताना धोकेदायक ठरू शकते.
अक्कलकुवा तालुक्यातील व सातपुड्याच्या डोंगराळ भागातील ओहवापाडा, गोरजाबारी येथील कोलवीमाल ते ओहवापाडा येथील देवनदीवर पूल नसल्याने नदीच्या पलीकडील कोलवीमालपाडा, गोरजाबारीपाडा, ओहवापाडा, खाईपाडा, आधरबारीपाडा, बेझीलपाडा, जागदापाडा, पाडवीपाडा या पाड्यांवरील नागरीकांना बाजारासाठी व शासकीय कामासाठी नदी ओलांडून खापर व अक्कलकुवा येथे यावे लागत असते.
गेल्या पाच ते सहा दिवसापासून सातपुड्याच्या डोंगराळ भागात पावसाची संततधार सुरू असून, शुक्रवारी ओहवापाडा येथील नागरीक बाजारासाठी खापर येथे आले असताना नदीला पाणी नव्हते. मात्र घरी परतत असताना या देवनदीला पाणी आल्याने ओहवापाड्यातील नागरीकांना या नदीतील पाण्याच्या वाहत्या प्रवाहातूनच घराकडे जीवमुठीत धरून जावे लागत होते. या वेळेस जर नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली असती तर या नागरिकांसाठी तो धोकेदायक प्रवास ठरू शकला असता.
दरम्यान, संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या पाड्यांवरील नागरीकांची पावसाळ्यात पुलाअभावी होणारी गैरसोय बघता त्वरित या ठिकाणी पूल मंजुर करून पुलाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असाही संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वरिष्ठांनी व लोकप्रतिनिधींनी याठिकाणचे गांभीर्य जाणून घेत त्वरित निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.
ओहवापाडा व गोरजाबारी पाडा येथील नागरिकांना कोलवीमाळ ते ओहवापाडा नदीवर पुलाअभावी भर पावसाळ्यात आजारी रूग्णास व गरोदर मातांना औषधोपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेण्यासाठी मोठी अडचण येत असते. तसेच या दरम्यान असलेल्या देवनदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होण्याची वाट पाहावी लागत असल्याने अशातच दुर्घटनादेखील घडू शकते. त्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून ग्रामस्थांची होणारी गैरसोय त्वरित पूल निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.
- सुभाष पाडवी, ओहवापाडा-गोरजाबारी, ता.अक्कलकुवा