दोन बोटांना शाई यंदा कुणालाही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 12:43 IST2019-04-28T12:42:40+5:302019-04-28T12:43:28+5:30
ईटीपीबीएस पद्धतीचा परिणाम : फ्रॉक्सी मतदानाचे प्राधिकार पत्र यंदा कुणीही भरले नाही

दोन बोटांना शाई यंदा कुणालाही नाही
मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :दोन बोटांना शाई यंदा कुणालाही लावली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात सर्व्हीस व्होटर मधून फ्रॉक्सी मतदानासाठी यंदा कुणीही निवडणूक विभागाकडे अर्ज केला नाही. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीमनुसार (ईटीपीबीएस) सर्व्हीस व्होटरला यंदा मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सुटसुटीत पद्धतीचा लाभ जिल्ह्यातील सर्वच अर्थात ९८५ मतदारांना घेतला.
सैनिकी मतदार अर्थात सर्व्हीस व्होटर यांना पूर्वी पोस्टाने बॅलेट पेपर पाठविला जात असे. तो मिळाल्यानंतर त्यावर मत देवून ते परत पाठविले जात होते. ही फारच किचकट प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक सर्व्हीस व्होटर आपल्या नातेवाईकांना फ्रॉक्सी मतदानाचा अधिकार देत होते. त्यामुळे अशा प्राधिकार दिलेल्या मतदाराला त्याचे स्वत:चे आणि प्राधिकार दिलेल्या मतदाराचे मतदान करावे लागत होते. परिणामी त्याच्या दोन बोटांना शाई लावली जात होती.
आता ईटीपीबीएस पद्धत
नोकरीनिमित्त अथवा निवडणुकीच्या कामासाठी बाहेर गावी असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदान पद्धतीने मतदान मागविले जाते.
यंदा सैन्यातील अधिकारी, कर्मचारी (सर्व्हीस व्होटर) यांच्यासाठी नवीन प्रणाली कार्यान्वित केली असून, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार मतदार संघातील या मतदारांना आॅनलाईन पद्धतीने मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.
दोन बोटांना अशी लागते शाई...
दुसºया व्यक्तीला मतदानाचा दिलेला अधिकाराला प्रॉक्सी मतदान असे म्हटले जाते. त्यानुसार पत्नी, भाऊ, मुलगा, वडिल, आई यापैकी एकाला हा अधिकार दिला जातो. ते अधिकार पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्यावर निवडणूक निर्णय अधिकारी अशा प्रॉक्सी व्होटरची वेगळी नोंद करतात. संबधीत जर त्याच ठिकाणी मतदार असेल तर त्याचे नाव वेगळ्या यादीत राहते. तशा सुचना संबधीत मतदान केंद्र संचालकांना कळविल्या जातात. मतदान करण्यासाठी आलेला संबधीत मतदार आपले स्वत:चे मत टाकतांना त्याच्या तर्जनीला शाई लावली जाते तसेच अधिकार दिलेल्या व्यक्तीचे मतदान करतांना त्याच्या मधल्या बोटाला शाई लावली जाते. त्यामुळे एकाच मतदानाच्या वेळी त्याच्या दोन बोटांना शाई लावली जाते.