गुंजाळी, खरवड शिवारातून शेती साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST2021-07-25T04:25:55+5:302021-07-25T04:25:55+5:30
परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी पिके जगविण्यासाठी कसरत करीत आहेत. त्यातच चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, गुंजाळी व खरवड शिवारातून सुमारे ...

गुंजाळी, खरवड शिवारातून शेती साहित्याची चोरी
परिसरात पाऊस नसल्याने शेतकरी पिके जगविण्यासाठी कसरत करीत आहेत. त्यातच चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, गुंजाळी व खरवड शिवारातून सुमारे ४० शेतकऱ्यांच्या सबमर्सिबल पंपाची केबल व इतर साहित्य चोरून नेले. नवीन केबल टाकण्यासाठी एका शेतकऱ्याला तीन हजार रुपये खर्च येतो. शिवाय केबल खरेदीचा खर्च वेगळा असतो. सद्य:स्थितीत पाऊस नसल्याने बागायती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. नवीन केबल टाकण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी जातो. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी दिले गेले नाही, तर नुकसान होऊ शकते. केबलसह शेती साहित्य चोरी करणारे व हे चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. गेल्या तीन दिवसांत गुंजाळी, मोहिदा, उमरी, कढेल, मोड, खरवड येथील शेतकऱ्यांच्या केबलची चोरी झाली आहे. त्यात अनिल नारायण ठाकरे, उद्धव पाटील, सोमनाथ मोहन ठाकरे, प्रल्हाद भारती, युवराज ठाकरे, आनंदा राऊळ, नरेश चव्हाण, विष्णू पवार, भावसिंग ठाकरे, मोग्या माळी, सुरेश ठाकरे आदी ४० शेतकऱ्यांच्या केबल व इतर शेती साहित्याची चोरी झाली आहे. आधीच पाऊस नसल्याने शेतकरी संकटात आहेत. त्यात चोरट्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांसह चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.