नंदुरबार : व्यापाऱ्याला चहापाणी पडली चार लाखात, नवापूर पोलिसात गुन्हा दाखल
By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 29, 2023 18:09 IST2023-04-29T18:09:42+5:302023-04-29T18:09:54+5:30
ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परभणी येथील व्यापाऱ्याचे चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नवापूर नजीक धाब्यावर घडली.

नंदुरबार : व्यापाऱ्याला चहापाणी पडली चार लाखात, नवापूर पोलिसात गुन्हा दाखल
नंदुरबार : ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परभणी येथील व्यापाऱ्याचे चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नवापूर नजीक धाब्यावर घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचे कवसडी ता. जिंतूर, जि. परभणी येथील व सध्या सुरत येथे व्यावसाय करणारे राजेश बालमुकुंद शर्मा (४२) हे शनिवारी ट्रॅव्हल्स बसने सुरत येथे जाण्यासाठी प्रवास करीत होते. बस नवापूर नजीक हॉटेल साईराम येथे थांबली. त्यावेळी शर्मा यांनी चार लाख रुपये रोख असलेली बॅग त्यांच्या सीटवर ठेवली. धाब्यावर चहापाणी केल्यानंतर ते पुन्हा बसमधील त्यांच्या सीटवर गेले असता त्यांना बॅग जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी सह प्रवाशांना विचारणा केली. चालक व सह चालकास विचारणा केली, परंतु उपयोग झाला नाही.
सर्व प्रवासी खाली उतरल्यावर चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत राजेश शर्मा यांनी नवापूर पोलिसात याबाबत फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अशोक मोकळ करीत आहे.