अक्कलकुव्यात दंगलीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:03 IST2019-05-10T12:03:02+5:302019-05-10T12:03:07+5:30

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या : वाहने, दुकानांचे नुकसान, पोलिसांवर दगडफेक

Tension due to riots in Akkalkunya | अक्कलकुव्यात दंगलीमुळे तणाव

अक्कलकुव्यात दंगलीमुळे तणाव

अक्कलकुवा/खापर : बसमधील जागेचा वाद अक्कलकुवा येथे हाणामारीत आणि दंगलीत परावर्तीत झाला. संतप्त जमावाने दुकान, वाहने आणि पोलिसांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. त्यांना नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही धुश्मचक्री सुरू होती. नंदुरबारातून वाढीव पोलीस बंदोबस्त पोहचल्यावर जमाव पांगला. दरम्यान, शहरात तणाव पूर्ण शांतता आहे. एका गटाच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटाविरुद्ध तर पोलिसांकडून दोन्ही गटातील जमावाविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.
अक्कलकुवा येथील व्यापारी गौतमचंद राणुलाल जैन हे बुधवारी सायंकाळी नंदुरबार-सेलंबा बसने अक्कलकुवा जाण्यासाठी नंदुरबार बसस्थानकातून चढले. यावेळी त्यांचा बसमधील अकिल अहमद शेख रा.सितामढी (बिहार) यांच्याशी सीटवरील जागा सांभाळण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. अकील शेख यांनी गौतम जैन यांना बेदम मारहाण केली. बसमधील प्रवाशांनी त्यांना सोडविले. त्यांनी मोबाईलद्वारे त्यांची माहिती अक्कलकुवा येथील त्यांचा मुलगा अक्षय यांना दिली.
जमाव हिंसक बनला
अक्षय त्यांचे नातेवाईक व पोलीस कर्मचारी अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ बसची वाट पहात थांबले. तेथे अकील शेखच्या गटातील जमाव देखील थांबला. बस पोहचल्यावर पुन्हा मारहाण झाली. पोलिसांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली. तेथे पुन्हा दोन्ही गटातील जमाव जमला. पोलिसांनी त्यांना समजवून तेथून माघारी पाठविले. यातील एका गटाचा जमाव परत जातांना झेंडा चौक व फेमस चौकात हिंसक बनला. दगडफेक करीत वाहनांची, दुकानांची तोडफोड केली.
अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अपुरे मणुष्यबळ असल्यामुळे जमावाला नियंत्रीत करण्यास अडचण आली. अखेर अश्रू धुराच्या दोन नळकांड्या फोडल्यानंतर जमाव तेथून पसार झाला.
या दरम्यान जमावाने चार चाकी चार वाहने व दुचाकी एक वाहनाची तोडफोड केली. शिवाय दुकानाचे शटर उचकवून त्यातील १६ हजार ७०० रुपये रोख, दहा हजार रुपये किंमतीचे दुकानातील साहित्य चोरून नेले. तशी फिर्याद गौतमचंद जैन यांनी अक्कलकुवा पोलिसात दिली आहे.
अतिरिक्त फोर्स रवाना
जमावा अनियंत्रीत होत असल्याचे पाहून सहायक पोलीस निरिक्षक भंडारे यांनी अतिरिक्त कुमक मागविली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अतिरिक्त कुमक अक्कलकुव्यात पोहचल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.

Web Title: Tension due to riots in Akkalkunya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.