अक्राळे येथे दहा लाखांचे अफूची झाडे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:07+5:302021-03-01T04:36:07+5:30
नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे शिवारात मका आणि तुरीचा पिकाचा अडोसा घेऊन अफूची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. तीन ते पाच ...

अक्राळे येथे दहा लाखांचे अफूची झाडे जप्त
नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे शिवारात मका आणि तुरीचा पिकाचा अडोसा घेऊन अफूची शेती उद्ध्वस्त करण्यात आली. तीन ते पाच फूट उंचीची साधारणत: ५०५ किलो वजनाची व दहा लाख रुपये किमतीची झाडे काढून जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना माहिती मिळाल्यावरून ही कारवाई एलसीबीने केली. शनिवारी सायंकाळी उशिरा अक्राळे शिवारातील जगन गोबा धनगर यांच्या मक्याच्या शेतात छापा टाकण्यात आला. शेतात मक्याचे पीक तसेच अफूची बेकायदेशीररित्या झाडे आढळली. बाजूला असलेल्या कृष्णा गोबा धनगर यांच्या शेतात देखील झाडे आढळली. दोन्ही शेतात लागवड केलेली तीन ते पाच फूट उंचीची परिपक्व झालेली व बोंडे आलेली अफूची एकूण ५०५ किलो वजनाची व दहा लाख १५ हजार रुपये किमतीची झाडे असल्याचे निष्पन्न झाले. ते सर्व जप्त करण्यात आले.
याबाबत ज्ञानेश्वर जगन धनगर व कृष्णा गोबा धनगर, रा.रजाळे, ता.नंदुरबार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ज्ञानेश्वर धनगर यांना अटक केली आहे तर दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरीक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार रवींद्र पाडवी, राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे, तालुका निरीक्षक अरविंद पाटील, ज्ञानेश्वर सामुद्रे, ज्ञानेश्वर पाटील यांच्या पथकाने केली.