मंदीरे, मशिदी उद्यापासून उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 12:25 IST2020-11-15T12:25:17+5:302020-11-15T12:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सर्वच धार्मिक स्थळे सोमवार अर्थात दिपपर्वातील पाडव्यापासून उघडण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे ...

मंदीरे, मशिदी उद्यापासून उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सर्वच धार्मिक स्थळे सोमवार अर्थात दिपपर्वातील पाडव्यापासून उघडण्यास राज्य सरकारने अनुमती दिली आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. धार्मिक स्थळांमध्ये जातांना तोंडावर मास्क असणे आवश्यक असून गर्दी होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, याबाबत सविस्तर आदेश रविवारी जिल्हाधिकारी काढणार आहेत.
गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेल्या धार्मिक स्थळांना उघडण्याची परवाणगी राज्य सरकारने शनिवारी दिली. सोमवारपासून आता सर्वच मंदीरे, मशिदी, गुरूद्वारा, चर्च उघडणार असून भाविकांना तेथे पूजा, प्रार्थना करता येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धार्मिक स्थळे उघडण्याची मागणी होत होती. ती अखेर पुर्ण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धार्मिक स्थळे उघडण्याबाबत रविववारी जिल्हाधिकारी आदेश काढतील. त्यात धार्मिक स्थळांमधील कोरोनाच्या उपाययोजनांसह इतर सुचनांचा समावेश राहणार आहे. राज्य सरकारने आदेश देतांना धार्मिक स्थळात जातांना मास्क बंधनकारक केला आहे. शिवाय एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत. दिवाळीच्या पर्वातच आता मंदीरे उघडणार आहेत.
सोमवारपासून मंदीरे उघडण्याची परवाणगी मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे. गणपती मंदीरात आवश्यक त्या उपाययोजना आहेत. भाविकांनी देखील कोरोनाबाबत स्वयंशिस्तीने याबाबत दक्षता घ्यावी अशी अपेक्षा आहे.
-प्रदीप भट, गणपती मंदीर पुजारी.
नमाजसाठी येतांना भाविकांनी घरूनच हातपाय धुऊन येणे, मशिदीतील वस्तूंचा वापर करू नये. खाली फरशीवरच नमाज अदा करावी. तोंडाला मास्क लावूनच येणे अशा सुचना यापूर्वीच मौलवींच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
-मौलवी जकेरिया रहेमानी, नंदुरबार.