प्रति चक्रीवादळामुळे तापमान वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:54 IST2019-02-20T20:52:49+5:302019-02-20T20:54:51+5:30

वेस्टर्न डिस्टर्बन्स् : जळगाव, धुळे व नंदुरबारात फेब्रुवारीतच पस्तिशीपार

Temperature increase due to per hurricane | प्रति चक्रीवादळामुळे तापमान वाढ

प्रति चक्रीवादळामुळे तापमान वाढ

ठळक मुद्देकमाल व किमान तापमानात वाढमध्य प्रदेशाच्या हद्दीत प्रतिचक्री वादळाची निर्मितीजळगावचे कमाल तापमान ३८ अंश

नंदुरबार : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (प्रती चक्रीवादळ) खान्देशसह संपूर्ण राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे़ फेब्रुवारीतच जळगावचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून १९७४ नंतरचे हे फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाल तापमान ठरले आहे़
हवामानाच्या दृष्टीने चालू महिन्यात बरेच चढ-उतार दिसत आहे़ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खान्देशवासीयांना रेकॉर्ड ब्रेक थंडीचा अनुभव घेता आला तर आता महिना मध्यावर आला असताना वाढत्या तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे़ बुधवारी जळगाव, धुळे व नंदुरबारातील कमाल व किमान तापमानात वेगाने वाढ झालेली दिसून आली़ जळगावात बुधवारी १९७४ सालातील फेब्रुवारीनंतरचे सर्वाधिक उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले़ तर, धुळे व नंदुरबारात बुधवारी अनुक्रमे ३७.९ व ३७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, नंदुबारात १२ फेब्रुवारी १९५५ रोजी तब्बल ४०.५ सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर १९८४ साली ३९.५ तर १९८९ साली ३८.२ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती़
प्रतिचक्री वादळाची निर्मिती
भारताच्या उत्तर-पश्चिम भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स् निर्माण झाला आहे़ त्यामुळे उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींचा प्रभाव कमी झाला असून त्यातुलनेत बाष्पयुक्त वाऱ्यांचा (गरम वारे) प्रभाव आता वाढताना दिसून येत आहे़ भारताच्या पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत आहेत़ मध्य प्रदेशाच्या पट्टयात प्रतिचक्री वादळाची निर्मिती झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच येथून हा पट्टा उत्तर व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या भागात व्यापला गेला आहे़ शास्त्रीयदृष्ट्या फेब्रुवारी हा महिना हिवाळा या ऋृतुतच गणला जात असतो़ परंतु हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे स्थित्यंतर होत असताना या महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असतात़
तापमानात चढ-उतार होणार
साधारणत: मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते़ तर फेब्रुवारी महिना हा संक्रमणाचा म्हटला जात असतो़ वेस्टर्न डिस्टर्बन्स्मुळे फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे़ प्रतिचक्रीवादळाची निर्मिती झाल्याने पूर्व राजस्थान व मध्यप्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात उष्ण लहरींचा प्रभाव वाढला आहे़ पुणे वेधशाळेनुसार पुढील आठवडाभर उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात उष्ण व कोरडे वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ यासोबतच वातावरणात आद्रता ५० ते ६० टक्यांच्या दरम्यान राहणार आहे़
दरम्यान, ‘वेलनेस वेदर’चे नीलेश गोरे यांनी २४ फेब्रुवारीपर्यंत जळगावचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंशावर कायम राहणार असल्याचे ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले आहे़
(बातमीचे स्त्रोत : आयएमडी पुणे, कृषी महाविद्याल धुळे़ )
मध्य प्रदेशाच्या हद्दीत प्रतिचक्री वादळाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे पुर्वेकडील उष्ण वाºयांचा प्रभाव वाढला आहे़ फेब्रुवारीत तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळण्याची शक्यता आहे़
-डॉ़ शुभांगी भुते,
शास्त्रज्ञ, आयएमडी पुणे़

Web Title: Temperature increase due to per hurricane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.