टॉवरची होळी टाळण्यासाठी दूरसंचारची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:34 IST2019-11-11T12:34:06+5:302019-11-11T12:34:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ...

टॉवरची होळी टाळण्यासाठी दूरसंचारची धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान सेवा सुरळीत न झाल्यास चारही टॉवरची होळी करण्याचा इशाराही देत ग्राहकांनी दूरसंचारची झोप उडवली. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दूरसंचार धुळे विभाग महाप्रबंधकांनी पत्राद्वारे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.
दुर्गम भागात ऑनलाईन कामे करण्यासाठी केवळ बीएसएनएल नेटवर्कचाच आधार घ्यावा लागत आहे. परंतु वारंवार खंडीत होणा:या सेवेमुळे नागरिकांची कुठलीही ऑनलाईन कामे पूर्ण होत नाही. अशा सेवेमुळे नागरिकांमध्ये तब्बल तीन वर्षापासून नागरिकांना समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे. शिवाय भ्रमध्वनी देखील निकामी ठरत आहे. त्या भागातील बहुतांश भ्रमणध्वनीधारक विविध मुदतीचे महागडे रिचार्ज करीत आहे. रिचार्जचा नियोजित कालावधी संपेर्पयत सेवा सुरळीत होत नाही, यामुळे महागडय़ा रिचार्जची रक्कम वाया जात आहे. खरे तर ही रक्कम सेवेविना दूरसंचार विभागाला मिळणारे उत्पन्न असून ते अतिरिक्त ठरत आहे.
अशा या खंडीत सेवा सुरळीत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु संबंधितांकडून त्याची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी मोलगी परिसरातील मोलगी, सरी, वेली व जमाना या चारही बीएसएनएलच्या टॉवरला आग लावत त्यांची होळी करण्याचा इशारा दिला. यामुळे दूरसंचार विभागाची यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
चारा व लाकडे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे निवेदन देतांनाच ग्राहकांनी जाहिर केले होते. टॉवर जाळण्याचा इशारा दिल्यानंतर निवेदन देणा:या ग्राहकांच्या सर्व प्रतिनिधींना मोलगी पोलीसांमार्फत नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यात असे गैरकृत्य करता येणार नाही, केल्यास गंभीर गुन्हे दाखल करण्यात येईल, असे म्हणत विधायक मार्गाने न्याय मिळवावा, असेही नमुद करण्यात आले होते. मोलगी पोलीस ठाण्यामार्फत दिलेल्या नोटीसीनेही इशारा देणा:या ग्राहकांवर फारसा परिणाम दिसून आला नाही. उलट त्यांच्या या होळी करण्याच्या आंदोलनाला राष्ट्रीय अनुसूचित दक्षता परिषद व भिलीस्थान टायगर सेना यांनी समर्थन देत या आंदोलनात आम्हीही उतरणार असल्याचा सांगण्यात आले होते.
एक राजकीय पक्ष व एका संघटनेने दिलेल्या पाठींब्यामुळे मोलगी भागातील ग्राहक आंदोलन करण्यासाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहे.
या आंदोलनामुळे दुरसंचार विभागाला कदाचित आपल्या मालकीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होईल याची जाणीव झाली असावी. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दुरसंचार विभागाच्या धुळे विभागीय कार्यालयाच्या महाप्रबंधकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पत्राद्वारे सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे पुन्हा बीएसएनएल यंत्रणा व ग्राहकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत ग्राहक नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.