बारी येथे साग व सिसमचे लाकूड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST2021-04-11T04:29:40+5:302021-04-11T04:29:40+5:30

बारी गावातील रवी रुस्तुम कोकणी, अनिल तुकाराम कोकणी, पिंटू कोकणी यांच्या घरांमध्ये अवैध लाकूड फर्निचर कारखान्यावर छापा टाकत दीड ...

Teak and sesame wood seized at Bari | बारी येथे साग व सिसमचे लाकूड जप्त

बारी येथे साग व सिसमचे लाकूड जप्त

बारी गावातील रवी रुस्तुम कोकणी, अनिल तुकाराम कोकणी, पिंटू कोकणी यांच्या घरांमध्ये अवैध लाकूड फर्निचर कारखान्यावर छापा टाकत दीड लाखांचा लाकूड साठा व फर्निचर जप्त करण्यात आले आहे. बारी गावात अवैध फर्निचर तयार करून आंतरराज्य तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाल्याने शनिवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई करण्यात आली आहे. वनविभागाचा मोठा फौजफाटा घेऊन अवैध दीड लाखाचे लाकूड तीन वाहनात भरून जप्त केले आहे. ही कारवाई साधारणत: दोन तास चालली. या कारवाईने वन तस्करांचे धाबे दणाणले आहे.

नवापूर वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात अवैध लाकूड तस्करी व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याने कारवाई करण्यात आली आहे. बारी गावातील एका घराची झडती घेतली असता घरातून पलंग एक नग, दिवाण एक नग व १२१ कट साईजचे साग नग व फिनिश टिंबर माल अंदाजे तीन ते साडेतीन घनमीटर साग व सिसम माल मिळून आला. या मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत दीड लाख रुपये आहे.

नवापूर वनविभाग सातत्याने अवैध लाकूड तस्करी करणाऱ्यांवर करवाई करीत आहे. ही कारवाई वन उपविभागीय अधिकारी धनंजय पवार यांच्या आदेशनुसार चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल आर. बी. पवार यांच्या पथकाने केली. या कारवाईत वनक्षेत्रपाल प्रशांत हुमणे, गस्ती पथक शहादा रत्नपारखे, वनक्षेत्रपाल रोहयो नंदुरबार, वनपाल युवराज भाबड, आरती नगराळे, नितीन मंडलिक यांच्या वनविभागाच्या ३५ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तीन ते चार वाहनांमध्ये लाकूड भरून बारीहून नवापूर वन आगारात पंचनामा करून माल जमा करण्यात आला. शेजारील गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात साग, सिसम, खैर, शिवण अशा मौल्यवान प्रजातीचे लाकूडतोड करून फर्निचर तयार करून इतर राज्यात रवाना केले जाते. नवापूर वनविभाग सातत्याने कारवाई करीत असल्याने वन्यप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Teak and sesame wood seized at Bari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.