नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक संख्या रिक्त राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 19:28 IST2019-02-17T19:27:58+5:302019-02-17T19:28:04+5:30
जि.प.स्थायी समिती सभा : शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती, उपाययोजनेची मागणी

नंदुरबार जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शिक्षक संख्या रिक्त राहणार
नंदुरबार :जिल्ह्यात पेसा क्षेत्राअंतर्गत तब्बल २१० शिक्षकांच्या जागा रिक्त राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत देण्यात आली. बैठकीत आरोग्य व महिला बालकल्याणसह इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली.
अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष सुहास नाईक, सभापती दत्तू चौरे, लताबाई पाडवी, हिराबाई पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, मनिष सांगळे, सदस्य रतन पाडवी, सागर धामणे, सिताराम राऊत, निलिमा पावरा उपस्थित होते. यावेळी वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अनेक दिवसांपासून फाईल पेंडींग असल्याचे रतन पाडवी यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी फाईलमधील त्रुटी दूर करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले. पेसा अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या २१० जागा रिक्त राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सागर धामणे यांनी दुर्गम भागासाठी शिक्षकांना डीएड व टीईटी मध्ये सूट देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषदेचे रनाळे येथे असलेल्या विश्राम गृहात अनेक समस्या असून ते बंदच राहत असल्याचे सुहास नाईक यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता पाटील यांनी येथील वीज बील आणि पाणी पट्टी थकली असल्यामुळे ते बंद करण्यात आले असल्याची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी यांनी अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करण्याची सोय करावी अशा सुचना दिल्या.
येत्या दोन वर्षात आवश्यक त्या ठिकाणी जागा उपलब्ध असेल तेथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम केले जाईल. त्यासाठी जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. दुर्गम भागात पत्र्याच्या अंगणवाडीची मागणी रतन पाडवी यांनी केली. चौपाळे येथे जनसुविधेअंतर्गत स्मशानभुमी होत नाही. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा मृतदेह यापुढे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात आणण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
बैठकीत पाणी टंचाई, हातपंप नवीन घेणे व जुन्यांची दुरूस्ती, विहिरी व कुपनलिका यांचे अधिग्रहण व तात्पुरत्या पाणी योजना घेणे यासह इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली. सर्व विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.