शिक्षक दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST2021-09-06T04:34:50+5:302021-09-06T04:34:50+5:30
आष्टे शाळेतील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शिक्षकदिनी सन्मानपत्र देऊन सत्कार आष्टे, ता.तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांचा ...

शिक्षक दिन उत्साहात साजरा
आष्टे शाळेतील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समितीमार्फत शिक्षकदिनी सन्मानपत्र देऊन सत्कार
आष्टे, ता.तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात ग्रेड मुख्याध्यापक कैलास लोहार, उपशिक्षक दौलत रामोळे, मधुकर कांबळे, राजेंद्र सूर्यवंशी, दिलीप वळवी, संगीता चौधरी यांचा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनश्याम वानखेडे, उपाध्यक्ष रंजना नाईक, सदस्य तुकाराम मराठे, नामदेव शिंदे, मीना सैंदाणे, सुनीताबाई ठाकरे, सुमनबाई वानखेडे, कमलबाई पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सन्माननीय सदस्यांच्या हस्ते सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांना गौरवण्यात आले. या वेळी विद्यार्थी नैतिक ठाकरे, कृष्णा पवार, अश्विनी मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले.
- प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिर, नंदुरबार
नंदुरबार शहरातील प्यारीबाई ओसवाल विद्यामंदिरात शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात बालमंदिराच्या विद्यार्थ्यांसाठी रंगकाम, पहिलीच्या विद्यार्थ्यांकरिता आवडणारे चित्र, दुसरीसाठी विविध आकाराची फुले, तिसरीसाठी ठसेकाम, चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी कोलाज चित्र हे विषय देण्यात आले होते. यात पहिली ते चौथीच्या १०० विद्यार्थ्यांनी तर बालमंदिर विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येऊन त्यांना ऑनलाइन डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी कौतुक केले. शिक्षक दिनानिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवून शिक्षकाची भूमिका पार पाडली. स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. तसेच सामाजिक अंतर राखत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रसंगी मुख्याध्यापकांच्या हस्ते सर्व शिक्षक बंधू-भगिनींना शिक्षक दिनानिमित्त पेन व नॅपकिन देण्यात आला.