विमाकवचाशिवाय करताहेत शिक्षक कोरोना ड्यूटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST2021-04-30T04:39:08+5:302021-04-30T04:39:08+5:30
नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोरोना काळात विविध कामे लावण्यात आली आहेत. गावोगावी सर्वेक्षण करणे, लसीकरणासाठी नोंदणी ...

विमाकवचाशिवाय करताहेत शिक्षक कोरोना ड्यूटी
नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोरोना काळात विविध कामे लावण्यात आली आहेत. गावोगावी सर्वेक्षण करणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, कन्टेन्मेंट झोनमध्ये नियुक्ती यासह इतर कामे शिक्षक करीत आहेत. परंतु शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शिक्षकांना कोरोना विमाकवच दिले गेलेले नाही. याबाबत शिक्षक संघटनांचा पाठपुराव्यालाही पाहिजे ते यश आलेले नसल्याची स्थिती आहे.
कोरोना काळात काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्करप्रमाणे शिक्षकांनादेखील कोरोना विमाकवच देण्याचे शासनाने जाहीर केेले होते. परंतु वर्ष उलटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यासह जिल्ह्यातदेखील अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले. काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहीजण त्यातून बाहेर पडले. या काळात त्यांची व कुटुंबाची अपरिमित हानी झाली. असे असतानाही विमाकवच नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट असताना शिक्षकांना क्वारंटाईन केंद्र, कन्टेन्मेंट झोन या ठिकाणी ड्यूटीसह विविध बाबींचे सर्वेक्षणदेखील सोपविण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणदेखील पार पाडावे लागत होते. ही सगळी कसरत करीत असताना दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या. जानेवारीपर्यंत प्राथमिक शाळाही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक पुन्हा आपल्या शाळेवर जाऊ लागले. आता कोरोनाची दुसरी लाट आली.
ही लाट भयंकर असल्याने प्रशासन त्याच्याशी लढतांना विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहेत. कर्मचारी संख्या अपूर्ण पडू लागल्याने शिक्षकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी आपल्या स्तरावरून शिक्षकांच्या नियुक्त्या करीत आहेत.
आता तर माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या गावातील पथकात एक शिक्षक आहे. घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. अनेक गावे ही कोरोना बाधित आहेत. अशा ठिकाणी शिक्षक आपली सेवा बजावत आहेत.
यापूर्वी शिक्षकांनी गावात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरणासाठी सर्वेक्षण केले आहे. असे असताना शिक्षकांना विमाकवच नसल्यामुळे नाराजी पसरली आहे.
विविध शिक्षक संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परंतु शासन त्याबाबत फारसे गांभीर्य दाखवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.