The teacher also fights for the cleanliness of the students | विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी शिक्षकाची अशीही धडपड
विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी शिक्षकाची अशीही धडपड

नथ्थू जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापूर तालुक्यातील बोरवण येथील जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी गरीब ऊसतोड मजुरांच्या मुलांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून चक्क या शाळेतील एका शिक्षकानेच दैनंदिन शिक्षणाचे काम सांभाळून विद्यार्थ्यांचे लांब वाढलेले केस कर्तन करून चांगला संदेश दिला आहे.
तालुक्यातील बोरवण येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत ३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे ऊसतोड मजूर आहेत तर उर्वरित कोतवार समाजाचे असून टोपली विणण्याचे काम करतात. येथे संपूर्ण आदिवासी समाजाची वस्ती आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उदरनिर्वाहासाठी पालक बाहेरगावी आपल्या मुलांना घेऊन जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मात्र येथील शिक्षकांनी त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विनंती केल्याने काही मुले त्यांच्या आजी-आजोबांकडे राहतात.
वयोवृद्ध आजी-आजोबांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्यांना त्यांच्या नातवंडांच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नव्हते. त्यामुळे यातील बºयाच विद्यार्थ्यांचे डोक्यावरील केस हे बºयाच प्रमाणावर वाढलेले होते. लांब वाढलेल्या केसांमुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आपल्या विद्यार्थ्यांची अशी बिकट अवस्था पाहून शाळेतील शिक्षक दिलीप गावीत यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे म्हणून स्वत: कैची घेऊन केस कटींग करण्याचा निर्धार केला. त्यांनी विद्यार्थ्यांना याविषयी विचारणा केली असता विद्यार्थ्यांनीही तयारी दर्शवली. त्यांनी एका विद्यार्थ्याचे केस कापल्यानंतर इतर विद्यार्थीही माझी कटींग करून द्या म्हणून सांगू लागले.
या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षक दोघांनाही आनंद झाला. अशा प्रकारचे उपक्रम राबवीत असताना विद्यार्थ्यांच्या पालकांचे काही पैसे वाचतील, विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जाणीव निर्माण होईल व स्थलांतरामुळे विद्यार्थी गळती काहीअंशी तरी थांबेल. दिलीप गावीत या शिक्षकाच्या उपक्रमशील कार्याचे विस्तार अधिकारी रेखा पवार, केंद्रप्रमुख सतीश कदमबांडे, मुख्याध्यापिका यशोदा वसावे व शिक्षकांनी कौतुक केले.

Web Title: The teacher also fights for the cleanliness of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.