स्वयंपाकाची चव महागली; आता महागाईला मसाल्याची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST2021-08-21T04:35:43+5:302021-08-21T04:35:43+5:30
नंदुरबार : देशात इंधन दरवाढीचे गंभीर परिणाम दिवसेंदिवस समोर येत असून, आता तेल आणि साखरेसोबतच मसाल्याचे पदार्थही महागले ...

स्वयंपाकाची चव महागली; आता महागाईला मसाल्याची फोडणी
नंदुरबार : देशात इंधन दरवाढीचे गंभीर परिणाम दिवसेंदिवस समोर येत असून, आता तेल आणि साखरेसोबतच मसाल्याचे पदार्थही महागले आहेत. या महागाईला अफगाणिस्तानात सुरू झालेल्या गृहयुद्धाचीही काहीशी किनार असल्याचे बोलले जात आहे.
देशात इंधनाच्या वाढत्या दरांमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढून विविध पदार्थांची भाववाढ सुरू झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे मासिक बजेट हे आधीच कोलमडले आहे. यात आता मसाल्याचे पदार्थही महागले असून, जिल्ह्याला मसाला पुरवठा करणाऱ्या दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय राज्यांतील पुरवठादारांनी दरवाढ केली असल्याची माहिती येथील विक्रेते देत आहेत.
घरातील खर्चावर नियंत्रणच राहत नाही. सर्वच ठिकाणी अधिकचे पैसे द्यावे लागतात. किराणा मालासाठी वर्षभरापूर्वीचा खर्च आणि आताचा खर्च यात खूप मोठी तफावत निर्माण झाली आहे. महागाई शासनाने नियंत्रण आणून नागरिकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
- वैभवी पाटील, गृहिणी
सगळेच गरजेचे आहे. कशात कपात करावी आणि करू नये हेच कळत नाही. दिवसेंदिवस खर्च वाढतो; परंतु आवक मात्र कमी आहे. एकाच्या पगारातून संसार चालवणं सोपं काम नाही. महागाई ही अनियंत्रित झाली आहे. त्यावर आता नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे.
- वत्सलाबाई सूर्यवंशी, गृहिणी
मसाल्याचे दर वाढले आहेत. काही पदार्थ दुपटीपेक्षा अधिक दराने वाढले आहेत. उर्वरित मात्र स्थिर आहेत. परंतु गरजेच्या प्रत्येक मसाल्यात वाढ झाली आहे. इंधनदरवाढीचा हा परिणाम आहे.
- विशाल चाैधरी, व्यावसायिक
मसाले आणि सुकामेवा यांच्या दरात वाढ झाली आहे. येत्या काळातही ही दरवाढ होणार आहे. दरवाढीमुळे मोठ्या संकटांचा सामना सर्वांनाच करावा लागत आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीही कारणीभूत आहेच.
- महेश सितपाल, व्यावसायिक