तळोदा तालुका : रोजगार हमी योजनेचे सोशल ऑडीट सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 12:56 IST2018-01-17T12:56:18+5:302018-01-17T12:56:24+5:30

तळोदा तालुका : रोजगार हमी योजनेचे सोशल ऑडीट सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत गेल्या वर्षी तालुक्यात झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण अर्थात सोशल ऑडीट सोमवारपासून सुरू करण्यात आले. या वेळी 20 ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी अंकेक्षकांमार्फत कामांच्या पाहणीबरोबरच आढावा घेतला जात आहे.
केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे मोठय़ा प्रमाणात केली जात असतात. शासन या योजनेवर मोठा निधी खर्च करीत असताना कामांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण केला जात असतो. त्यामुळे शासनाने यंदापासून या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी स्वतंत्र अंकेक्षण संचालनालय स्थापन केले आहे. या यंत्रणेमार्फतच तळोदा तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींचे सोशल ऑडीट केले जात आहे. यासाठी दोन टप्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रक्रियेस प्रत्यक्ष सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. सन 2016-2017 मध्ये शासनाने रोजगार हमी योजनेंतर्गत साधारण चार कोटी 83 लाख रुपयांचा निधी खर्च केला आहे. त्यात अकुशल कामगारांसाठी तीन कोटी 90 लाख तर कुशल कामगारांसाठी 90 लाख 83 हजार रुपयांचा समावेश आहे. सदर कामे ग्रामपंचायती, कृषी विभाग व सामाजिक वनीकरण या यंत्रणांमार्फत करण्यात आली आहेत. तालुक्यातील बोरद, रांझणी, अमोनी, आमलाड, मोदलपाडा, मालदा, धनपूर, लाखापूर (फॉरेस्ट), धवळीविहीर, नर्मदानगर, लाखापूर (रे), लोभाणी, शिव्रे, कोठार, अंमलपाडा, रोजवे पुनर्वसन, चिनोदा, करडे, अशी 20 गावांमध्ये हे अंकेक्षक घरकुले, सार्वजनिक व वैयक्तिक शौचालये, शोषखड्डे, राजीव गांधी भवन, वृक्ष लागवड, फळबाग, सिंचन विहिरी, नाला बल्डींग, बोध, अशा वेगवेगळ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करीत आहेत. त्या बरोबरच कामे दिलेल्या मजुरांची भेट, त्यांचे जॉब कार्ड, हजेरी पत्रक, मजुरांचा काम मागणी अजर्, कामाचे फोटो, ग्रामपंचायतीचा नकाशा, साहित्याचे अदा केलेले बील, ग्रामपंचायतीचे मालमत्ता रजिस्टर, बँक पासबुक, जॉब कार्डाची यादी, कामाचा कार्यारंभ आदेश, कामांचे मंजूर अंदाजपत्रक, ग्रामसभेचा ठराव आदी वेगवेगळ्या कागदपत्रांची ही पडताळणी केली जात आहे.
सामाजिक अंकेक्षणासाठी तालुक्यातून साधारण 60 अंकेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर या अंकेक्षकांना संचालयांमार्फत चार दिवसाचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. अतिशय पारदर्शीपणे कामांचे ऑडीट करण्याच्या सूचना यंत्रणेमार्फत देण्यात आल्या आहेत. साहजिकच यामुळे संबंधितांची जबाबदारी निश्चित होईल. ग्रामपंचायीच्या सामाजिक ऑडीटसाठी जिल्हा समन्वयक नितीन शेजूळकर, तालुका समन्वयक नितेश इंगोले, एल.एम.चक्रनारायण परिश्रम घेत आहे. दरम्यान शासनाने प्रथमच रोजगार हमीच्या कामांचे ऑडीट सुरू केल्याने ग्रामीण भागामध्ये समाधान व्यक्त होत आहे. मात्र निकृष्ठ कामांचेही पितळ उघडे पडणार आहे.