वाळू डंपर अडविल्याच्या वादातून तलाठी महिलेस मारहाण, नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 13:09 IST2021-06-06T13:08:52+5:302021-06-06T13:09:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वाळू वाहतुकीचे डंपर अडविल्याचा रागातून नगरसेवक गौरव चौधरी यांनी मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची ...

वाळू डंपर अडविल्याच्या वादातून तलाठी महिलेस मारहाण, नगरसेवकाविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वाळू वाहतुकीचे डंपर अडविल्याचा रागातून नगरसेवक गौरव चौधरी यांनी मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद महसूल विभागाच्या पथकातील तलाठी निशा पावरा यांनी शहर पोलिसात दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, जातिवाचक शिवीगाळ व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवार, ५ जून रोजी दुपारी ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, भाजप नगरसेवक गौरव चौधरी यांच्या मालकीचे वाळू वाहतूक करणारे डंपर तहसीलदारांनी नियुक्त केलेल्या पथकाने अडविले. त्यावेळी गौरव चौधरी तेथे आले. त्यांनी पथकाशी वाद घातला. वादातून पथकातील तलाठी महिला निशा पावरा यांना धक्काबुकी करून खाली पाडले, तसेच कानशिलात मारून जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप तलाठी पावरा यांनी फिर्यादीत केला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक गौरव चौधरी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत.
दरम्यान, पथकाने वाळू डंपर अडवून चालकाकडून ५० हजारांची मागणी केल्याचा आरोप नगरसेवक चौधरी यांनी केला आहे. ते देखील पोलिसात फिर्याद देणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.