लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतजमीनीच्या उतारावर वडिलांच्या लावलेल्या नावात दुरूस्ती करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्विकारतांना खांडबारा, ता.नवापूर येथील तलाठी यास लाच लूचपत प्रतिबंधक विभागातर्फे रंगेहात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी देखील याच तलाठीस नंदुरबार येथील तलाठी कार्यालयात लाच घेतांना पकडले होते. जयसिंग गुंजाऱ्या पावरा, तलाठी, देवमोगरा, सजा खांडबारा असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. नवापूर येथील शेतकरी यांचे डोगेगाव, ता.नवापूर शिवारात शेत आहे. त्या शेताच्या सातबारावर संबधीत शेतकऱ्याच्या वडिलांचे नाव होते. त्यात दुरूस्ती करण्यासाठी तलाठीने दीड हजार रुपयांची मागणी केली. याबाबत शेतकरी यांनी नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे खांडबारा येथील मंडळ अधिकारी कार्यालयात पैसे देण्याचे ठरले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. दीड हजार रुपये घेतांना तलाठी पावरा यांना रंगेहात अटक करण्यात आली. विशेष म्हणजे १२ मार्च २०१८ रोजी जयसिंग पावरा यांना नंदुरबार येथील तलाठी कार्यालयात लाच घेतांना अटक करण्यात आली होती. त्यांना निलंबीत केले गेले होते. कर्तव्यावर हजर झाल्यानंतर पुन्हा जयसिंग पावरा यांनी लाच घेतली आणि जाळ्यात अडकले. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
तलाठीला पुन्हा लाच भोवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 12:33 IST