सव्वा तास सुरक्षेचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:54 IST2019-04-07T17:53:43+5:302019-04-07T17:54:04+5:30
नंदुरबार स्थानक : ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन प्लॅटफार्म एकच्या कामांची होणार चौकशी

सव्वा तास सुरक्षेचा घेतला आढावा
नंदुरबार : पश्चिम रेल्वेचे डीआरएम सुनील कुमार यांनी शनिवारी नंदुरबार रेल्वे स्थानकाला भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला़ सुमारे ४० अधिकाऱ्यांच्या लवाजमासह डीआरएम सुनील कुमार सव्वा तास रेल्वे स्थानकावर थांबून होते़
दरम्यान, शनिवारी पहाटे सुनील कुमार मुंबई सेेंट्रल येथून सूरतसाठी रवाना झाले होते़ सुरत येथे सकाळी पोहचल्यावर त्यांनी उधना, बारडोली, व्यारा, नवापूर येथून नंदुरबार येथे हजेरी लावली़ साधारणत: अडीच वाजेच्या सुमारास ते इतर अधिकाऱ्यांच्या पथकासह नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहचले़ त्यांच्यासोबत पश्चिम रेल्वेचे मंडल वाणिज्य निरीक्षक अभय सानप, वरिष्ठ मंडल परिचालक सुहानी मिश्रा व इतर सुमारे ४० अधिकाऱ्यांचा ताफा होता़
सध्या देशात लोकसभा निवडणुकींचे वारे वाहत असल्याने तसेच गुप्तचर यंत्रणांकडून विविध राज्यात व महत्वाच्या रेल्वे मार्गांवर हायअलर्ट जाहिर केले असल्याने पश्चिम रेल्वेंतर्गत येणाºया विविध रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे़
विविध कामांचा घेतला आढावा
डीआरएम सुनील कुमार यांनी सुमारे सव्वा तासाच्या पाहणी दौºयात नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या विविध विभागांना भेट देऊन संबंधित कामाचा आढावा घेतला़ या वेळी त्यांनी रेल्वेच्या कंट्रोल रुमलाही भेट दिली़ त्यात त्यांनी रेल्वे गाड्यांची सिग्नल व्यवस्था, प्रवासी व वाहतूक रेल्वे गाड्यांच्या वेळा, गेल्या वर्षीचे सर्व रेकॉर्ड रुम आदींची तपासणी करण्यात आली़ डीआरएम सुनील कुमार यांनी लोकोपायलट कक्षातील पॅनल रुमलाही भेट देऊन तेथील कामांचा आढावा घेतला़
सुनील कुमार यांची प्रथम भेट
डीआरएम सुनील कुमार यांची नंदुरबार रेल्वे स्थानकाला ही प्रथमच भेट होती़ याआधी साधारणत: वर्षभरापूर्वी तत्कालीन डीआरएम मुकूल जैन यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती़ दरम्यान, सुनील कुमार यांच्या दिमतीला चार डब्यांची खास रेल्वे गाडी होती़ त्यांनी नंदुरबार येथील स्थानकाला भेट झाल्यानंतर सुमारे पावने चार वाजता ते दोंडाईचा व त्यानंतर पाळधी येथे रवाना झाल्याची माहिती प्रशासनाने दिली़