खाजगी रुग्णालये जादा बिलं घेत असल्यास कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 12:22 IST2020-08-30T12:22:44+5:302020-08-30T12:22:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयांना कोरोनावर उपचाराची परवाणगी देण्यात आली आहे. त्यांना शासकीय दरही ठरवून ...

Take action if private hospitals charge extra bills | खाजगी रुग्णालये जादा बिलं घेत असल्यास कारवाई करा

खाजगी रुग्णालये जादा बिलं घेत असल्यास कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात चार खाजगी रुग्णालयांना कोरोनावर उपचाराची परवाणगी देण्यात आली आहे. त्यांना शासकीय दरही ठरवून देण्यात आले आहे. असे असतांना जादा बिलं काढल्याच्या सामान्य नागरिकांच्या तक्रारी आल्यास थेट कारवाई करण्याच्या सुचना पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी आढावा बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित होते.
अ‍ॅड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यात आरटीपीसीआर लॅब सुरु झाल्यामुळे जास्तीत जास्त स्वॅब तपासणीसाठी फिरत्या पथकांची व्यवस्था करावी. आजाराची प्राथमिक लक्षणे दिसताच त्वरीत उपचार सुरू करण्यात यावे. नागरिकांनीदेखील लक्षणे आढळल्यास वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी. खाजगी कोविड रुग्णालयात शासकीय दरानेच सेवा दिली जाईल व नियमांचे पालन होईल यांची संबंधितांनी दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालय वाढीव दराने बिल देत असल्याच्या तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना बाधित व्यक्तिंची संख्या सातत्याने वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यामातून सर्व प्रकारचे प्रयत्न करीत आहेत.
या प्रयत्नांना नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: ग्रामीण भागात नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर केला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, घराबाहेर पडल्यावर शारिरीक अंतर राखावे व हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनेटायझर लावावे.
अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे, असे आवाहन त्यांनी केले. खावटी योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची माहिती संकलीत करा राज्य शासनामार्फत ११ लाख ५५ हजार कुटुंबाना खावटी अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वंचित आदिवासी बांधवाची माहिती संकलीत करण्यात यावी. योजनेच्या अंमलबजावणीच्यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारी करावी.
शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना शिधापत्रिका देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत नवापूर, शहादा, चिंचपाडा तसेच अक्कलकुवा येथे कोविड रुग्णासाठी कोविड हॉस्पीटल आणि कोविड केअर सेंटर सुरु करण्याबाबत तसेच सुरक्षा व्यवस्था, रोजगार हमी योजना, सार्वजनिक वितरण प्रणाली, खरीप पीक कर्ज, वनदावे आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस प्रातांधिकारी, तहसिलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धुळे येथे पालकमंत्र्यांसमोर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यावेळचा लाठीमारची घटना राज्यभर गाजली. नंदुरबारला देखील पालकमंत्र्यांची बैठक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तसेच पालकमंत्री जाणार असल्याच्या मार्गावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कुंपनाच्या मुख्य प्रवेशद्वारासह मिटिंग हॉल आणि इतर ठिकाणी बंदोबस्त होता.

Web Title: Take action if private hospitals charge extra bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.