दुष्काळग्रस्तांच्या मदतीला कासवगतीने धावली यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:55+5:302021-06-16T04:40:55+5:30

धडगाव : नंदुरबार जिल्हा टंचाईमुक्त राहत असला तरी धडगांव तालुक्यातील कुंडलच्या गुगलमालपाड्यासाठी मात्र दुष्काळी परिस्थिती पाचवीला पूजलेलीच आहे. गुगलमालपाड्याच्या ...

The system rushed to the aid of the famine victims | दुष्काळग्रस्तांच्या मदतीला कासवगतीने धावली यंत्रणा

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला कासवगतीने धावली यंत्रणा

धडगाव : नंदुरबार जिल्हा टंचाईमुक्त राहत असला तरी धडगांव तालुक्यातील कुंडलच्या गुगलमालपाड्यासाठी मात्र दुष्काळी परिस्थिती पाचवीला पूजलेलीच आहे. गुगलमालपाड्याच्या दुष्काळग्रस्तांना टंचाईमुक्तीचा आधार मिळावा यासाठी मागील मार्च महिन्यातच प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा करूनही अपेक्षेनुसार शासनाने दखल घेतली नव्हती. दुष्काळग्रस्तांच्या जीवनाचा प्रश्न जाणून घेत पुण्यनगरीने त्यांच्या समस्यांना वाचा फोडली. त्याची दखल घेत प्रशासनाने गुगलमालपाड्यासाठी टँकर मंजूर केले; परंतु ही मंजुरी किमान दोन महिन्यांपूर्वी मिळणे अपेक्षित असताना ऐन पावसाच्या तोंडावर टँकरला मंजुरी दिली. ही बाब गुगलमालपाडाकरांच्या अपेक्षापूर्तीसाठी केलेला देखावाच ठरत आहे. शिवाय प्रशासनाला दुष्काळग्रस्तांबाबत उशिरा आलेली जाग ही या यंत्रणेच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करणारीदेखील ठरत आहे.

शासनस्तरावर नंदुरबार जिल्हा टंचाईमुक्त ठरत असला तरी कुंडलचा गुगलमालपाडा मात्र वर्षानुवर्षे टंचाईग्रस्तच राहिला आहे. तेथील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत अनेक उपाययोजना करण्यात आल्या; परंतु या उपाययोजना मात्र प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे सपशेल अपयशी ठरल्या. त्यामुळे या पाड्यातील दुष्काळ हा एक परंपराच बनली आहे. पाणीटंचाईच्या तीव्र झळा सहन करीत तेथील माता-भगिनींसह प्रत्येक नागरिक पाणी मिळविण्यासाठी ५० फूट खोल दरीत पायपीट करीत असतो. या नागरिकांचा दरीतील हा प्रवास जणू तारेवरची कसरतच ठरते. दरीत उतरून आणलेल्या पाण्याच्या शुद्धतेबाबत कदापिही शाश्वती देता येत नाही. या पाड्यातील पाणीटंचाईशी दोन हात करीत तेथील नागरिक केवळ दूषित पाण्यावरच जीवन व्यतीत करीत आहेत.

मानवी जीवन म्हटल्यानंतर दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासह लग्न, उत्तरकार्य अशा कार्यक्रमांसाठीही पाण्याची मोठी आवश्यकता भासते. त्याशिवाय पशुधन व घरांच्या बांधकामासाठीदेखील मुबलक पाण्याची गरज असते; परंतु पाण्याबाबत सर्व गरजा गुगलमालपाडाकरांना भागवता येत नाहीत. या गरजांना मूठमाती देत तेथील नागरिक पाणीटंचाईवर मात करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी त्यांचे हे प्रयत्न अपुरे ठरत आहेत.

दुष्काळ लक्षात घेत तेथील रहिवासी तथा पंचायत समिती सदस्य गोविंद पाडवी यांनी मार्च महिन्यातच टँकर मंजुरीसाठी प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार गोविंद पाडवी व तेथील नागरिकांनी पाठपुरावाही केला. मात्र, शासनाकडून दखल घेतली गेली नाही. अखेर वृत्त प्रसिद्ध करीत तेथील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने उशिरा का असेना गुगलमालपाड्यासाठी टँकर मंजूर करून दिला. टँकर मंजुरीमुळे दुष्काळग्रस्तांनी समाधान व्यक्त केले; परंतु ऐन पावसाच्या तोंडावर टँकरला मंजुरी देत दुष्काळग्रस्तांबाबत सहानुभूतीचा केवळ देखावाच केल्याचे म्हटले जात आहे. दुष्काळाची दाहकता अधिक असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे ही बाब निदान दोन महिन्यांपूर्वीच अंमलात आणली असती तर दुष्काळग्रस्तांना खऱ्या अर्थाने आधार मिळाला असता. दुष्काळाच्या तीव्र झळा सहन केल्यानंतर पावसाच्या प्रतीक्षेत असताना नागरिकांना टँकरची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा नागरिक काही दिवसच लाभ घेऊ शकतात. त्यामुळे या दुष्काळग्रस्तांच्या मदतीला शासन यंत्रणा आली असली तरी यंत्रणा कासवगतीने धावून आल्याचेच म्हटले जात आहे.

गुगलमालपाड्यात पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन

धडगाव तालुक्यातील कुंडलच्या गुगलमालपाडा येथे दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य गोविंद पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे उद्‌भवणारी समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे गुगलमालपाडा येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करीत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य गोविंद पाडवी यांनी केले. यावेळी जान्या पराडके, खाअल्या शेठ, महेंद्र पराडके, दिलवर वळवी, कांतीलाल वळवी, लोटन पाडवी, दिनकर पाडवी, गोमा पाडवी, गुलाब वसावे, सुनील पाडवी, फुलसिंग पराडके, सायका वसावे, केल्ला पाडवी, अनिल वळवी, दामा पाडवी, कागडा पराडके, रान्या पराडके आदी उपस्थित होते.

Web Title: The system rushed to the aid of the famine victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.