स्वॅब वाढल्याने बाधीतही वाढताहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:46 IST2020-08-03T12:46:00+5:302020-08-03T12:46:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. रविवारी आणखी ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ...

स्वॅब वाढल्याने बाधीतही वाढताहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. रविवारी आणखी ४४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे एकुण पॉझिटिव्ह संख्या आता ६४७ झाली आहे. तर रविवारी आणखी एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृत्यूंची संख्या ३४ झाली आहे. कोरोना बाधीतांच्या वाढत्या संख्येमुळे आता जिल्ह्यात चिंतेचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यातील अहवालांची वेटींग दिवसेंदिवस वाढत आहे. रविवार दुपारपर्यंत वेटींग ३२० पर्यंत गेली होती. सायंकाळपर्यंत १३० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी तब्बल ३७ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दोन दिवसात पॉझिटिव्ह आढळलेल्यांची संख्या ९० पेक्षा जास्त झाली आहे. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण हे नंदुरबार व शहादा शहरातील आहेत. रविवारी आलेल्या अहवालांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे शहादा येथील आले आहेत. ३७ पॉझिटिव्ह पैकी २६ रुग्ण हे शहादा शहर व तालुक्यातील आहेत. तर नंदुरबार शहर व तालुक्यातील आठ, तळोदा तीन तर नवापूर येथील एकजण आढळून आला.
याशिवाय गुजरातमधील निझर तालुक्यातील एकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. आता पॉझिटिव्ह रुग्णांची जिल्ह्यातील संख्या तब्बल ६४७ इतकी झाली आहे. त्यात ७० टक्के रुग्ण हे नंदुरबार शहर व तालुक्यातील आहेत. २० टक्के शहादा तर १० टक्के रुग्ण हे तळोदा व नवापूर व इतर तालुक्यातील आहेत.
नंदुरबार शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या आता ४०० पार होण्याच्या बेतात आहे. तर शहाद्याची रुग्णसंख्या दोनशेच्या घरात गेली आहे. यामुळे या दोन्ही शहरांमध्ये प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे.
स्वॅबचे प्रमाण वाढले
जिल्ह्यात स्वॅब संकलनाचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. खाजगी हॉस्पीटलच्या रुग्णांचेही स्वॅब टेस्टींग मोफत करून दिली जात आहे. याशिवाय जास्त रुग्ण आढळून येत असल्यामुळे त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या देखील जास्त राहत आहे.
परिणामी स्वॅब संकलन जास्त होत असतांना स्वॅब तपासणीचे प्रमाण मात्र तेवढेच असल्यामुळे वेटींग वाढत आहे. शनिवारी दुपारी ५०० पर्यंत वेटींग गेली होती.
मृत्यूच्या प्रमाणातही वाढ...
जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. रविवारी आणखी एका बाधीताचा मृत्यू झाला. शहादा येथील वृद्धाला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या कोविड कक्षात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर नंदुरबारात अंत्यसंस्कार करण्यात आले.
४जिल्ह्यात गेल्या काही दिवसात नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. परंतु धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण नसल्यासारखे आहे. त्यामुळे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब मानली जात आहे.
४धडगाव तालुक्यात तर आतापर्यंत केवळ एकच रुग्ण आढळून आला आहे. येथील स्वॅब घेण्याचे प्रमाण देखील कमी आहे.