जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू केले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:19 IST2021-07-12T04:19:44+5:302021-07-12T04:19:44+5:30

नंदुरबार : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनासोबत दोन हात करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उसंत मिळाली आहे. यामुळे ...

Surgery at district hospital; Did the stopped treatment resume? | जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू केले का?

जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू; थांबलेले उपचार पुन्हा सुरू केले का?

नंदुरबार : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनासोबत दोन हात करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना उसंत मिळाली आहे. यामुळे सहा महिन्यांत रखडलेल्या विविध आजारांच्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात असून त्यांना गती देण्यात आली आहे.

सहा महिन्यांनंतर सुरू झालेल्या या शस्त्रक्रियांमुळे गाेरगरीब रुग्णांची सर्वांत मोठी साेय झाली आहे. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शस्त्रक्रियांच्या प्रतीक्षेत असलेले केवळ औषधी घेत वेळ मारुन नेत होते. या आजारांची तीव्रता वाढूनही खासगी रुग्णालयात होणारा खर्च परवडणारा नसल्याने सिव्हिलच्या निर्णयाची वाट पाहिली होती. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाची तीव्रता कमी होऊन रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने थांबलेल्या शस्त्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून या शस्त्रक्रियांना गती आल्याची माहिती दिली गेली आहे. शस्त्रक्रिया पूर्णवेळ सुुरू झाल्या असल्याने दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिक येऊ लागले असल्याची माहिती दिली जात आहे. रुग्णांना शेड्युलनुसार तारखा देऊन त्यांच्या शस्त्रक्रिया पूर्ण होत आहेत.

जिल्हा रुग्णालयात या शस्त्रक्रिया झाल्या सुरू

जिल्हा रुग्णालयात सध्या हर्निया, ॲपेंडिक्स, सिझर, गर्भपिशवीच्या शस्त्रक्रिया, अस्थिरोग यासह अपघातात तुटलेली हाडे जोडण्याच्या शस्त्रक्रिया होत आहेत.

सध्या नेत्र शस्त्रक्रियांना मात्र ब्रेक देण्यात आला आहे. येत्या काळात या शस्त्रक्रियाही सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नेत्रकक्षात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होता.

ओपीडीला दिला गेला वेग

जिल्हा रुग्णालयात सध्या ओपीडी सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी सकाळी ९ वाजेपासून याठिकाणी भेटत असल्याने ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागातून गर्दी होत आहे.

जिल्हा रुग्णालयात दीड वर्षाच्या दीर्घकाळानंतर दिवसाला साधारण २०० पेक्षा अधिक रुग्णांची दैनंदिन तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत.

सहा महिन्यांपासून मुलाच्या अपघात झालेल्या पायाची शस्त्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे गावाहून येणे शक्य नव्हते. पायाची जखम भरावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने योग्य ते उपचार करून दिले आहेत; परंतु कोरोनामुळे गावी निघून गेलो होतो. येथून वेळोवेळी औषधी भेटत होत्या. यामुळे दिलासा होता. आता पुढच्या दोन दिवसांत शस्त्रक्रिया आहे.

-जत्र्या फत्तू वसावे, अक्कलकुवा.

मुलाचे पोट दुखत असल्याने गावी उपचार केले होते; परंतु बरे वाटले नाही. दवाखान्यात दाखवल्यावर ॲपेंडिक्स असल्याचे सांगण्यात आले. खासगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नसल्याने चार महिन्यांपासून सिव्हिलमध्ये संपर्क करत होतो; परंतु आता येत्या आठवड्यात शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे दिलासा आहे.

-करमसिंग पाडवी, तळोदा.

रुग्णांची काळजी घेण्यावर भर

जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियांना गती दिली जात आहे. येत्या काळात नेत्ररुग्णांसाठीही शस्त्रक्रियाही सुरू करू. नियोजन करण्यात येत आहे. रुग्णांची काळजी घेण्यावर सध्या भर देण्यात येत असून शस्त्रक्रियांच्या तारखा रुग्णांना दिल्या जात आहेत.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, नंदुरबार.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या बहुतांश नागरिकांवर शासकीय रुग्णालयांमध्येच उपचार झाले आहेत. जिल्हा रुग्णालय गोरगरिबांचे हक्काचे ठिकाण होते.

लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधितांना जिल्हा रुग्णालयातून वेळावेळी मोफत औषधीही देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.

Web Title: Surgery at district hospital; Did the stopped treatment resume?