बलदाणे धरणातील पाणीसाठ्याचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST2021-03-19T04:29:34+5:302021-03-19T04:29:34+5:30
कारवाईच्या भीतीने पुन्हा होतेय धावपळ नंदुरबार : शहरातील विविध भागांत वाहनांच्या तपासणीला गती देण्यात येत आहे. याअंतर्गत दुचाकी व ...

बलदाणे धरणातील पाणीसाठ्याचा आधार
कारवाईच्या भीतीने पुन्हा होतेय धावपळ
नंदुरबार : शहरातील विविध भागांत वाहनांच्या तपासणीला गती देण्यात येत आहे. याअंतर्गत दुचाकी व चारचाकी वाहनांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन वाहनचालक कारवाईच्या भीतीने पोलिसांना पाहून पळापळ करत असल्याचे प्रकार सुरू आहेत.
करण चाैफुलीवरचे खड्डे बुजवले
नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर गेल्या वर्षी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने या भागात रस्ता नूतनीकरण करण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरात पुन्हा खड्डे पडले होते. हे खड्डे पुन्हा बुजवण्यात आले आहेत. संबंधित विभागाकडे नागरिकांनी माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने खड्डे बुजवले आहेत.
समस्या कायम
नंदुरबार : तालुक्यातील तापी काठालगतच्या गावांमध्ये शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून शेतकरी हैराण झाले आहेत. कंपनीने या गावांसाठी चांगल्या दर्जाचे ट्रान्सफाॅर्मर देण्याची मागणी आहे. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कारवाई झालेली नाही.
साइडपट्टी द्यावी
नंदुरबार : सेंधवा ते विसरवाडी या महामार्गावर नंदुरबार ते प्रकाशादरम्यान लहान शहादे गावात रस्ता काम पूर्ण झाले आहे. यात आरोग्य केंद्रासमोर एका बाजूला मातीचा भराव नसल्याने अपघातांची शक्यता आहे. या ठिकाणी मातीचा भराव करून देण्याची गरज असतानाही महामार्ग विभागाचे दुर्लक्ष आहे.
दुर्गम भागात आमचूरच्या हंगामाची तयारी
धडगाव : गेल्या वर्षात कोरोनामुळे मागे पडलेला आमचूरचा हंगाम यंदा मार्च अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी आदिवासी बांधवांकडून तयारी सुरू झाली असून होळीनंतर आमचूर तयार करण्याच्या कामांना गती येण्याची शक्यता आहे. आमचूर खरेदीसाठी व्यापाऱ्यांकडून संपर्क करण्यात आल्याची माहिती असून त्यानुसार झाडावरील कैऱ्यांची तोडणी करून कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे.
कृत्रिम टंचाई
नंदुरबार : जिल्ह्यात वीज कंपनीकडून थकबाकीदार ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठा कनेक्शन कट करण्यात येत आहे. यातून जिल्ह्यात कृत्रिम पाणीटंचाईचे संकट वाढत आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाने याकडे योग्य त्या पद्धतीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
द्राक्षांची आवक
नंदुरबार : शहरातील बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतून द्राक्षांची आवक वाढली आहे. काळी व हिरवी द्राक्षे सध्या खवय्यांची पसंती ठरत आहेत. या द्राक्षांचे दरही सामान्यांच्या आवाक्यात असल्याने बाजारपेठेत द्राक्षांची जोरदार खरेदी-विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे.